कृष्णेने राजकीय हेतूनेच वसुली थांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:27 AM2021-04-27T04:27:31+5:302021-04-27T04:27:31+5:30
इस्लामपूर : यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३१ मार्च २०१९ पर्यंत ऑडिट रिपोर्टच्या माध्यमातून कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याची ...
इस्लामपूर : यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३१ मार्च २०१९ पर्यंत ऑडिट रिपोर्टच्या माध्यमातून कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याची खात्री संस्थापक डॉ. इंद्रजित मोहिते यांना पटलेली आहे. निव्वळ कृष्णा कारखान्याने वसुली राजकीय हेतूनेच थांबविल्याने ठेवीदारांचे मोठ्या प्रमाणात नाराजी आणि हानी झाली आहे. त्यासाठी आम्ही क्षमायाचना मागतो. कर्जवसुलीपोटी स्थावर मालमत्तेच्या आधारावर सर्व ठेवीदारांचे पैसे सुखरूप आहेत. ते आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ, असे परिपत्रकाद्वारे संस्थेचे सचिव गणेश गरुड यांनी जाहीर केले आहे.
गरुड यांनी पत्रकात नमूद केले आहे, कर्ज वसुली टप्प्याटप्प्याने होईल. त्यानंतर मुद्दलीची रक्कम परत करू. व्याजाची रक्कम वसूल झाल्यानंतर सेव्हिंग्ज खात्यावर वर्ग केली जाईल. संस्थेच्या या परिस्थितीचा फायदा उठवून राजकारण करणाऱ्या मनसुब्याला बळी न पडता आपण संस्थेवर विश्वास ठेवावा, असे सचिव गरुड यांनी आवाहन केले आहे. दुर्दैवाने कृष्णा कारखान्याने दिलेल्या हमीपत्रकाच्या शाश्वतीचा ३१-७-२०१० रोजी तत्कालीन संचालक मंडळाने मान न राखता असहकार्याच्या भूमिकेचा ठराव केला. त्यानंतर दरवर्षी वसुलीचे स्मरणपत्र यादी देऊनसुद्धा दिलेल्या हमीपत्राचा मान राखला नाही. त्यामुळेचे ठेवीदार अडचणीत आले आहेत, असे गरुड यांनी स्पष्ट केले आहे.