कुपवाड : महापालिकेच्या स्थापनेपासून विकासकामांबाबत कायमच कुपवाडवर अन्याय होत आला आहे. आता तर पिण्याच्या पाणीवाटपातही अन्याय सुरू झाला असून, आमच्या वाट्याचे पाणी राजरोसपणे सांगलीला पळवले जात आहे, असा आरोप गुरुवारी पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत नगरसेवकांनी केला. दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या फेरआढाव्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांसमवेत पुन्हा सोमवारी बैठक घेणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
कुपवाड शहरातील पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी वाढू लागल्याने आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी कुपवाड विभागीय कार्यालयास अचानक भेट देऊन सहाय्यक आयुक्त गायकवाड यांना पाणीपुरवठा विभागाचे अधिकार दिले. नागरिकांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी गुरुवारी सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पाणीपुरवठा विभागाची बैठक झाली. यावेळी नाराजी व्यक्त करून कुपवाडच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी निर्णय घेण्यास सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने हीच बैठक पुन्हा सोमवारी घेण्याचा निर्णय घेतला.
नगरसेवक प्रकाश ढंग व विष्णू माने म्हणाले की, कुपवाडच्या पाणीपुरवठ्यासाठी चोवीस तास पंप सुरू असल्याचे सांगून दिशाभूल सुरू आहे. शहराला मुबलक पाण्यासाठी नव्याने टाक्या बांधल्या, पाइपलाइन टाकली आहे. तरीही कुपवाडकरांना पाणी मिळत नाही. शहराला सांगली, मिरजेच्या तुलनेने कमी तेही एक दिवसाआड पाणी मिळते. यापुढे मुबलक पाणी न मिळाल्यास प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील.
विजय घाडगे व राजेंद्र कुंभार यांनी मुबलक पाणीपुरवठा करण्याबाबत अधिकाऱ्यांचीच मानसिकता नाही, असा आरोप केला. पाणी सांगलीला पळविण्याला अधिकारीच जबाबदार आहेत. गुप्त बैठका घेऊन रात्रीस खेळ चालत असल्याचा आरोप यावेळी घाडगे व कुंभार यांनी केला. नागरिकांना दोन वर्षे बिले दिली जात नाहीत, तरीही दंड व्याजासह नागरिक बिले भरतात. हा अन्याय थांबवून सांगली, मिरजेप्रमाणे मुबलक पाणी द्यावे. अन्यथा, बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी नगरसेविका सोनाली सागरे, मनगू सरगर उपस्थित होते.
चौकट
पाणीपुरवठा कामगार वाटपात गोलमाल
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गळती काढणे व पाणीपुरवठ्यासाठीच्या कामगार वाटपातही अन्याय केला जात आहे. मिरजेला नव्याने योजना झाल्याने तेथे गरज नसताना पंधरा कामगार दिले आहेत. सांगलीला पंचवीस दिले आहेत, तर कुपवाडला फक्त सहा कामगार दिले आहेत. कामगार वाटपातही गोलमाल करून कुपवाडवर अन्याय केला जात आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला.