व्यवस्थापनाअभावी शेतकरी तोट्यात
By Admin | Published: December 7, 2015 11:44 PM2015-12-07T23:44:55+5:302015-12-08T00:44:28+5:30
मान्यवरांची खंत : जतमध्ये शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र
जत : पाणी व जमिनीचे व्यवस्थापन करून शेतकरी शेती व्यवसाय करीत नाहीत. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात जातो. खते व औषध फवारणी व्यवस्थापनाकडे शेतकरी जादा लक्ष केंद्रित करत आहेत. परंतु ही पद्धत जादा खर्चिक आहे, असे मत शेतकरी चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत येथे शेतकरी चर्चासत्र आयोजित केले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, तज्ज्ञ द्राक्ष उत्पादक एम. जी. म्हेत्रे, सोलापूर जिल्हा डाळिंब बागायतदार संघाचे अध्यक्ष अंकुशराव पडवळ, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी मार्गदर्शन केले. पाणी व जमीन व्यवस्थापन करून खते आणि औषध फवारणी कमी प्रमाणात केली, तर एकसारखी फळे तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतवारी करावी लागत नाही. शेतकरी खते आणि औषध फवारणीकडे लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे जमिनीची प्रतवारी बदलून त्याचा परिणाम फळपिकावर होत आहे. एकाच बागेतील फळांची तीन-चार ठिकाणी प्रतवारी करावी लागत आहे. त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, अशी खंतही तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड गादी वाफ्यावर करावी. त्यामुळे रोपात रोगप्रतिकार शक्ती वाढून झाडाची वाढ चांगली होते. मळ, तेल्या, बिब्ब्या या रोगांचा प्रादुर्भाव का होतो, याच्या मुळापर्यंत जाऊन शेतकरी चौकशी करत नाहीत. जुन्या शेती अभ्यासकांनी या बाबी पुस्तकात नमूद करून ठेवल्या आहेत. परंतु त्यांचे वाचन करून नियोजन होताना दिसत नाही, असे मतही तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, बाजार समिती सभापती संतोष पाटील, उपसभापती जीवन पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, माजी आमदार उमाजी सनमडीकर, दयगोंडा बिराजदार, आप्पू बिराजदार, पी. एम. पाटील, बाबासाहेब कोडग, विशाल पाटील, मीनाक्षी आक्की, आकाराम मासाळ, सुजय शिंदे, नीलेश बामणे आदी मान्यवर, शेतकरी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
नियोजनाचा सल्ला
पिकाचे नियोजन करा, माल कमी काढा, पाणी कमी द्या आणि जादा फायदा घ्या. जमिनीचे नियोजन न करता कमी प्रतवारीचा माल उत्पादन करून जादा दराची अपेक्षा करू नये. परदेशात डाळिंब पाठविण्यासाठी उत्पादन घेऊन त्याची निर्यात करावी. त्यातून निश्चित फायदा होणार आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.