महागाई कमी करण्यासाठी लावला कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:30+5:302021-06-16T04:36:30+5:30
सांगली : पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाईच्या विरोधात सोमवारी मदनभाऊ युवामंचाच्या वतीने सांगलीत अनोखे आंदोलन करण्यात आले. महागाई कधी कमी ...
सांगली : पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाईच्या विरोधात सोमवारी मदनभाऊ युवामंचाच्या वतीने सांगलीत अनोखे आंदोलन करण्यात आले. महागाई कधी कमी होणार, असे म्हणत, युवामंचाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या प्रतिमेला कौल लावला.
युवामंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, विष्णुअण्णा पाटील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्डातील पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन करण्यात आले.
लेंगरे म्हणाले की, सत्तेवर येताच शंभर दिवसांत महागाई कमी करतो, अशी घोषणा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, पण पेट्रोलने शंभरी पार केली असून, खाद्यतेलही वाढले आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता मरण यातना भोगत आहे. आतापर्यंत भाजप सरकारने केवळ आश्वासनांचे गाजरच दाखविले आहे. मेक इन इंडियाच्या नावावर मोठमोठी स्वप्ने दाखविली. कोरोनाच्या काळात देशात लसीची टंचाई असताना, परदेशात लस पाठविली. गॅस, डिझेलचे दरही वाढले आहे. काँग्रेसपेक्षा दुप्पट महागाई करणाऱ्या या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. या सरकारला जाग आणण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी कौल मागितल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक प्रकाश मुळके, अमर निंबाळकर, शीतल लोंढे, हाजी तौफिक बिडीवाले, मयूर बांगर, दिनेश सादिगले, अक्षय दोडमनी, नितीन भगत, कयुम पटवेगार, संजय कांबळे, प्रथमेश भंडे, शरद गाडे, संतोष कुरणे, मनोहर करमळकर, शंकर जामदार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.