विकासाचे व्हिजन असलेला नेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:27 AM2021-02-16T04:27:31+5:302021-02-16T04:27:31+5:30
मिरज पश्चिम भाग बारमाही वाहणाऱ्या कृष्णा आणि वारणा नद्यांमुळे समृद्ध झालेला परिसर आहे. ऊस, हळद, भाजीपाला, फूलशेती अशी नगदी ...
मिरज पश्चिम भाग बारमाही वाहणाऱ्या कृष्णा आणि वारणा नद्यांमुळे समृद्ध झालेला परिसर आहे. ऊस, हळद, भाजीपाला, फूलशेती अशी नगदी शेती करून येथील शेतकऱ्यांनी प्रगतीचा आलेख उंचावला आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात असताना वसंतदादा पाटील, संभाजी पवार, मदन पाटील, दिनकर पाटील यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले. काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हे या भागातील जनतेचे वैशिष्ट्य आहे. हेच जयंतराव पाटील यांनी ओळखले. याच मार्गावरून त्यांचीही वाटचाल सुरू आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत कसबे डिग्रज मंडलमधील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी ही आठ गावे नव्याने इस्लामपूर मतदारसंघात जोडली गेली. पण अगोदरपासूनच मंत्री म्हणून काम करीत असताना जयंत पाटील यांनी शासनाच्या २५/१५ या ग्रामविकासाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी या भागात केली. रस्ते, गटारी, सांडपाणी व्यवस्था ही पारंपरिक कामे करताना विकासाचे व्हिजन त्यांनी राबविले. म्हणूनच २००९ च्या निवडणुकीत जनतेने त्यांना भरभरून मतदान दिले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
लोकविकासाची कामे करताना त्यांनी ध्येय समोर ठेवून काम केले. प्राथमिक काळात मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला. शासनाच्या विविध योजनांचा वापर सुयोग्य पद्धतीने करून जास्तीत जास्त काम कसे करायचे, हे त्यांनी दाखवून दिले. २५/१५ योजना, लोकप्रतिनिधीचा स्थानिक विकास निधी, जिल्हा परिषदेच्या योजना, विविध प्रकारचे वित्त आयोग याद्वारे मिळणाऱ्या निधीचा पुरेपूर वापर केला. गावा-गावात रस्ते, पाणी पुरवठा योजना, कूपनलिका यासाठी काम केले. त्याचबरोबर गावा-गावात सर्वच जाती-जमातीसाठी समाजमंदिरे उभारली. शासकीय योजनांबरोबरच राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून पाणंद रस्ते विकास, कूपनलिकांची कामे केली जातात. गेल्या काही काळात त्यांनी गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत उपलब्ध करून दिली आहे. लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया यासाठी शासकीय रुग्णालयासह पुणे, मुंबई येथील मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल लोकांनाही मदत केली. त्याचप्रमाणे राजारामबापू बँक, राजारामबापू साखर कारखाना, सूतगिरणी यांच्या विकास योजना मिरज पश्चिम भागात पोहोचत आहेत. त्याचप्रमाणे सर्वोदय साखर कारखाना जोमाने चालू असल्याने या परिसरातील ऊस उत्पादकांचा प्रश्न सुटला आहे. चांगला ऊसदर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळेच विकासाची गंगा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत आहे. या भागातून जयंत पाटील यांना २००९, २०१४ आणि २०१९ या सर्वच निवडणुकांमध्ये मोठे मताधिक्य मिळाले आहे. लोकही त्यांना हक्काने कामे सांगतात. गावा-गावातील नेत्यांपेक्षा थेट लोकांमध्ये मिसळून ते कामे करतात. लाेकांनाही हेच भावले आहे.
गावा-गावात अनेक तरुण कार्यकर्ते तयार होत आहेत. आनंदराव नलवडे, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरत देशमुख, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष कुमार लोंढे, माजी उपसरपंच प्रमोद चव्हाण, उपसरपंच सागर चव्हाण, राहुल जाधव, उद्योजक भालचंद्र पाटील, दीपक राजमाने, राजाभाऊ बिरनाळे, बाळासाहेब मासुले, संदीप निकम, राहुल चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते तयार केले आहेत. सामाजिक, राजकीय कार्यात ही मंडळी चांगले काम करत आहेत.
सध्याच्या काळात कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, समडोळी, दुधगाव या मोठ्या गावांतील ग्रामपंचायत, सोसायटी, विविध प्रकारच्या संस्थांवर जयंत पाटील यांना मानणारे लोक सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांचीही कामे होत आहेत. भालचंद्र पाटील यांच्या पाठपुराव्याने कृष्णेवर सुमारे १२ कोटींचा पूल उभारला गेला.
कसबे डिग्रज ग्रामपंचायतीकडून गावात सांडपाणी प्रक्रिया व वाहून नेण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर भव्य क्रीडांगण करण्यात येणार आहे. या सर्वाबरोबरच २००५ आणि २०१९ ला आलेला महापूर, त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या कोरोना महामारीत जयंत पाटील यांनी गावा-गावात मोठ्या प्रमाणात मदत केली. कार्यकर्त्यांसाेबत पाण्यात उतरून काम केले, मदत पोहोचवली. त्याचबरोबर कोरोना काळातही बैठका घेतल्या. लोकांना मार्गदर्शन केले. आरोग्य यंत्रणा सक्षमपणे उभी केली.
चौकट
जयंतराव पाटील यांनी सर्वसामान्य माणसाला उपयुक्त अशा अनेक प्रभावी योजना राबविल्या आहेत. कामे करणारा नेता, अशी त्यांची ओळख बनली आहे. म्हणूनच त्यांच्याकडून अजूनही काही अपेक्षा जनतेतून व्यक्त करण्यात येत आहेत. मिरज पश्चिम भागातील क्षारपड जमीन सुधारणा योजना मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या भागातील युवकांना रोजगार संधीसाठी एखादा मोठा प्रकल्प सुरू करावा, अशीही मागणी हाेत आहे. राजारामबापू उद्योग समूहामध्ये सभासदत्व मिळावे. अशीही येथील जनतेची अपेक्षा आहे.
आज जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा होत असताना, त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी काम करण्याची संधी त्यांना मिळावी, मिरज पश्चिम भागाला वसंतदादा पाटील यांच्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व मिळावे, याच त्यांना सदिच्छा...!
- सोमनाथ डवरी, कसबे डिग्रज