वांगीतील निवासी शाळेला गळती
By Admin | Published: July 24, 2014 10:47 PM2014-07-24T22:47:29+5:302014-07-24T23:12:20+5:30
विद्यार्थ्यांचे हाल : साडेचार कोटी पाण्यात
मोहन मोहिते - वांगी-कडेगाव तालुक्यातील वांगी येथील ४ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या निवासी शाळेला गळती लागली आहे. तालुक्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुला-मुलींची निवासी शाळा मंजूर झाली. मात्र कडेगाव येथे जागा उपलब्ध न झाल्याने वांगी ग्रामस्थांनी निवासी शाळेमुळे गावाचे नाव होईल, यासाठी जागा देऊन इमारत उभी केली. शासनाने ४ कोटी ४२ लाख रुपये इमारतीसाठी खर्च केले. या तीनमजली इमारतीचे उद्घाटन १ मे २०१२ रोजी झाले, पण सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व निकृष्ट कामामुळे गळती सुरू झाली आहे. पहिल्या मजल्यावरील भोजनगृहाच्या छतातून पावसाचे पाणी येत आहे. निवासी खोल्या, स्वच्छतागृहामध्येही मोठ्या प्रमाणात गळती आहे. आतील फरशीही निकृष्ट दर्जाची आहे. यामुळे येथील कर्मचाऱ्यांना, मुलांना दुसऱ्या खोलीमध्ये हलवावे लागले आहे. दोनच वर्षात इमारतीची दुरवस्था झाली आहे.
प्रभारी मुख्याध्यापिका सौ. एस. एम. जाधव म्हणाल्या की, याबाबत सा. बांधकाम विभागाला दोन पत्रे दिली आहेत. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्यात मुलांना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे.