लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी 50 जणांचीच मर्यादा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 07:39 PM2021-02-19T19:39:07+5:302021-02-19T19:41:26+5:30
collector Sangli- राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना काटेकोरपणे करण्यात येत आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस सुरू असून लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने लग्न समारंभ व मंगल कार्यांसाठी 50 लोकांचीच मर्यादा ठरवून दिली आहे. याचे काटेकोरपालन मंगल कार्यालये व कार्यक्रमांचे यजमान अशा दोघानींही करणे अनिवार्य असून उल्लंघन झाल्यास दोघांवरही कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.
सांगली : राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना काटेकोरपणे करण्यात येत आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस सुरू असून लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने लग्न समारंभ व मंगल कार्यांसाठी 50 लोकांचीच मर्यादा ठरवून दिली आहे. याचे काटेकोरपालन मंगल कार्यालये व कार्यक्रमांचे यजमान अशा दोघानींही करणे अनिवार्य असून उल्लंघन झाल्यास दोघांवरही कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.
गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंगचे पालन करून लग्न समारंभ, मंगल कार्य करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगल कार्यालयेधारक, केटरींग असोसिएशन यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून चर्चा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले -बर्डे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्देशांचे पालन करण्याच्या अटींवर मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रम पार पाडण्यास परवानगी दिली आहे. लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचे उल्लंघन तसेच कोविड-19 च्या बाबत घ्यावयाची खबरदारी यांची तपासणी करण्यासाठी प्रशासनातर्फे तपासणी पथक गठीत करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोविड-19 चा पुन्हा सुरू होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मंगल कार्यालये धारकांनी सहकार्य करावे.
तथापि लग्न समारंभ पार पाडत असताना पुढील बाबी आवश्यक आहेत. लग्न समारंभात सामील व्यक्तीपैकी एखादा व्यक्ती कोविड-19 चा रूग्ण आढळल्यास सदर रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सहजरीत्या होण्याकरीता लग्न समारंभास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची (व्यवस्थापक कर्मचारी सहित) यादी संबंधित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह तसेच घर मालक यांनी त्यांच्याकडे जतन करून ठेवावी. संबंधित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह यांनी लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग करणे व त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे.
तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, योग्य पध्दतीने मास्कचा वापर, वारंवार साबणाने हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी टाळणे, अनावश्यक बाहेर न जाणे या बाबींचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचबरोबर कोमॉर्बिड रूग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.