सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाच मे पासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला याचा परिणाम कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला नसला तरी ३० टक्क्यांपर्यंत स्थिर झाला. हा पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा जास्त असून त्यामध्ये घट करण्याच्या दृष्टीने सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जिल्ह्यात आणखी तीन दिवस म्हणजे दि.17 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आला असून परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय सोमवारी घेण्यात येईल अशी स्पष्टता पालक मंत्री जयंत पाटील यांनी दिली.जिल्ह्यात पाळण्यात आलेल्या लॉकडाउनचा आढावा घेऊन कोरोना सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत आससगावकर, आमदार अनिल भाऊ बाबर,आमदार सुधीर गाडगीळ , आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार मानसिंग नाईक, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पोलीस उप जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज अधिष्ठाता सुधीर नणंदकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे चौगुले , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनचे आदेश 17 मे पर्यंत वाढविण्यात यावेत. या बैठकीत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची खते, बी-बियाणे, कीटकनाशके आदींबाबत गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी , तहसीलदार यांनी कृषी निविष्ठा दुकानदारांशी तात्काळ चर्चा करून कोरोना संसर्ग टाळून कृषी निविष्ठांची घरपोच डिलिव्हरी करता येईल का याबाबत चर्चा करावी. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्हेंटिलेटर बेड संदर्भात यंत्रणांनी अत्यंत काटेकोर समन्वय ठेवणे आवश्यक असून कोणत्याही गरजवंत रुग्णाला व्हेंटिलेटरवरील उपचारांची गरज असताना गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड हे डेडिकेटेड ठेवावेत.
महात्मा फुले जन आरोग्य योजना ज्या रुग्णालयांना लागू आहे त्यांनी रुग्णांना या योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे . जी हॉस्पिटल्स या योजनेचा लाभ रुग्णांना देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल . ज्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण मृत्यूची संख्या जास्त आहे, हॉस्पिटल्स पेक्षा जास्त रुग्ण ऍडमिट करून घेत आहेत त्यांचे ऑडिट होणे अवश्य असल्याचेही यावेळी अधोरेखीत केले. जत तसेच अन्य ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्या ठिकाणी आणखी आरोग्य व्यवस्था उपलब्ध व्हावी असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने आढावा सादर करून जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांपर्यंत स्थिर असून दररोज पाच ते सहा हजार कोरोना टेस्टिंग होत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या १४००पर्यंत निघत आहेत. सध्यास्थितीत रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा पुरेसा असून 87 ते 88 रुग्णालयात कोविड उपचारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत असून या पेक्षा जास्त रुग्णालयांची संख्या वाढल्यास या हॉस्पिटल्सना ऑक्सिजन पुरवठा करणे कठीण होईल असे अधोरेखित केले. रुग्ण संख्या नियंत्रित करण्याच्या दृष्टीने लॉकडाउनच्या कडक निर्बंधांची आणखी गरज त्यांनी प्रतिपादित केली . कोरोना हॉटस्पॉट झालेल्या गावांमध्ये टास्क फोर्स पाठवून परिणामांची कारणमीमांसा केली जाईल असे या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले.