सलग दुसऱ्या वर्षी लग्नसराईतच लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:07+5:302021-04-24T04:26:07+5:30
सदानंद औंधे लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : सलग दोन वर्षे लग्नसराईत लॉकडाऊन व लग्नकार्यावर निर्बंधांमुळे मिरजेतील मंगल कार्यालय चालकांना ...
सदानंद औंधे
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : सलग दोन वर्षे लग्नसराईत लॉकडाऊन व लग्नकार्यावर निर्बंधांमुळे मिरजेतील मंगल कार्यालय चालकांना मोठा फटका बसला आहे. एप्रिल व मे महिन्यातील लग्नकार्याचे बुकिंगही रद्द झाल्याने उलाढाल ठप्प आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे ऐन लग्नसराईत लाॅकडाऊन व लग्नसमारंभासाठी निर्बंधांमुळे मंगल कार्यालये बंद आहेत. लग्न, साखरपुडा, जावळ, मुंज, वाढदिवस इत्यादी समारंभ कार्यालयांत साजरे होतात. मिरजेत सुमारे ३५ मंगल कार्यालये व हाॅल असून, लग्नसराईत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. प्रत्येक समारंभासाठी वेगवेगळे भाडे आकारण्यात येते. सुटीच्या हंगामात लग्नसराईत दोन महिने मंगल कार्यालय चालकांचा चांगला व्यवसाय होतो. सधन व मध्यमवर्गीय मंगल कार्यालयात लग्न व इतर कार्यक्रमांसाठी लाखो रुपये खर्च करतात. मात्र सलग दोन वर्षे ही उलाढाल ठप्प आहे.
मिरजेतील सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेली मंगल कार्यालये लग्नकार्यासाठी प्रसिद्ध आहेत. लग्नसराईत मिरजेत कार्यालय मिळण्यासाठी सहा महिने अगोदर बुकिंग करावे लागते. मात्र वर्षभरानंतर आता पुन्हा लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालये बंद झाली आहेत. लग्नकार्यावर अवलंबून असलेले आचारी, भटजी, बँड, वाहतूकदार, छायाचित्रकार, सजावटकार यांसह इतर सर्वांचे व्यवसायही ठप्प आहेत. कोरोना साथीमुळे मंगल कार्यालये बंद आहेत. लग्नासाठी केवळ २५ जणांच्या उपस्थितीला परवानगी असल्याने घरगुती स्वरूपात लग्नकार्ये उरकण्यात येत आहेत. मंगल कार्यालयांना व्यावसायिक दराने घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिल आकारणी करण्यात येते. काही मंगल कार्यालयांना दरमहा चाळीस हजार ते एक लाखापर्यंत भाडे आहे.
लग्नसराईत दोन-तीन महिनेच काम असल्याने वर्षभराच्या खर्चाची व्यवस्था या काळातच करावी लागते. मात्र सलग वर्षभर लग्न व इतर कार्ये बंद असल्याने मंगल कार्यालय चालक अडचणीत आहेत. मंगल कार्यालय चालविणाऱ्यांना हे भाडे देणे अशक्य झाले आहे. १८ एप्रिलपासून विवाह मुहूर्त सुरू झाले आहेत. मे अखेर विवाह मुहूर्त संपणार असल्याने व यापुढील काळातही विवाह व अन्य कार्यक्रम होतील, याची खात्री नसल्याने मंगल कार्यालये व त्यावर अवलंबून असलेले कामगार व इतर व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नोव्हेंबरपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर एप्रिल व मे महिन्यातील काही मुहूर्त लग्नासाठी बुक झाले आहेत. मात्र आता लाॅकडाऊनमुळे हे कार्यक्रम रद्द झाल्याने बुकिंगसाठी घेतलेले पैसे परत देण्याचीही आर्थिक परिस्थिती नसल्याचे काही कार्यालयचालकांनी सांगितले.
चाैकट
कोरोना काळात अडचणीत आलेल्या मंगल कार्यालयचालकांना महापालिकेने घरपट्टी व पाणीबिलात सवलत द्यावी. थकीत वीजबिलासाठी महावितरणने वीजपुरवठा तोडू नये, अशी मागणी मंगल कार्यालयचालक ओंकार शुक्ल यांनी केली.
चाैकट
मिरज मंगल कार्यालयांची ख्याती असल्याने मिरजेत ब्राह्मणपुरीत कार्यालय रस्त्यावरील चाैकाचे जिलेबी चाैक असे नाव आहे. कार्यालय रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याने शहरातील कार्यालयांऐवजी शहराबाहेर पार्किंगसाठी जागा असलेल्या हाॅलना लग्नासाठी पसंती मिळत असल्यानेही जुनी कार्यालये अडचणीत आली आहेत.
------------