लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘रक्ताचं नातं’ या रक्तदान महायज्ञाला शुक्रवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. दिवसभरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या महायज्ञात सहभाग नोंदविला.
कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली. या परिस्थितीत सामाजिक दायित्व म्हणून ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी ही शिबिरे होणार आहेत.
सांगलीतील लोकमत भवन येथे सकाळी जिल्हाधिकारी डाॅ. चौधरी, महापौर सूर्यवंशी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले, हरिदास पडळकर, काॅ. उमेश देशमुख उपस्थित होते. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी राकेश दड्डण्णावर, अनिरुद्ध कुंभार, इनाम महम्मद सलाती, शुभम कांबळे, मुस्तफा मुजावर, गजानन नरुटे, सुशील डांगे, अण्णासाहेब डाेंबाळे, राजू सावंत, आकाश सूर्यवंशी, नवनाथ जाधव, संताेष पांढरे, दत्ता शेंडगे, नीलेश सावंत, शुभम आपटे, संगीता रे, पायल बिस्वास, रेहाना फकीर, सीमा शेख, आयेशा खातू, गायत्री धनवत, प्रमाेद गाेसावी, अखिल खाेत, विजय फडके, युवराज इनामदार, शहानवाज मुल्ला, मनीष आवटी, सचिन सूर्यवंशी, अनिल शेंदुरे, पंढरीनाथ पाटील, सागर झिरकांडे, चंद्रकांत गायकवाड, मिलिंद कदम, याेगेश नरुटे, श्याम पाटील, वैभव चिकाेडे, विजय चिकाेडे, अनिस व्यास आदींनी रक्तदान केले. या शिबिरात आयुष सेवाभावी संस्था, निर्धार फौंडेशन, इन्साफ फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही रक्तदान करीत सहभाग नोंदविला.
चौकट
वारांगनांनी केले रक्तदान
लोकमतच्या रक्तदान महायज्ञात शहरातील वारांगनांनी सहभाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सुंदरनगर येथील बंदव्वा माँ सोशल फौंडेशनच्या वारांगनांनी रक्तदान महायज्ञात भाग घेत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला.