जिल्ह्यात दारू तस्करांवर करडी नजर!

By admin | Published: October 13, 2014 10:31 PM2014-10-13T22:31:42+5:302014-10-13T23:02:54+5:30

पथके तैनात : छाप्यात २४ जणांना अटक; रेल्वे एसटीची तपासणी

Look at the liquor smugglers in the district! | जिल्ह्यात दारू तस्करांवर करडी नजर!

जिल्ह्यात दारू तस्करांवर करडी नजर!

Next

सचिन लाड- सांगली विधानसभा निवडणुकीत दारूचा महापूर वाहण्याची शक्यता असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा आणि कर्नाटक राज्यातून होणाऱ्या देशी व विदेशी दारू तस्करीवर करडी नजर ठेवली आहे. यासाठी दोन पथके तैनात केली आहेत. या पथकांनी गेल्या दहा दिवसात जिल्हाभर छापे टाकून २४ जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख वीस हजारांचा माल जप्त केला आहे, अशी माहिती अधीक्षक पी. ओ. गोसावी यांनी दिली. येत्या आठवड्यात ही मोहीम आणखी तीव्र करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
निवडणूक म्हटले की, दारू आणि जेवणावळ देण्याची पद्धत गेल्या काही वर्षांत रुजत गेली आहे. स्वस्तात दारू मिळविण्यासाठी गोवा व आणि कर्नाटक राज्यातील तस्करांशी संपर्क साधला जातो. अनेकदा इथेनॉलमिश्रित विषारी दारूही मिळते. ही दारू पिल्यावर जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.
यासाठी उत्पादन शुल्क विभागाने तस्करांवर करडी नजर ठेवली आहे. गेल्या दहा दिवसात या विभागाने अवैध दारूचा साठा व विक्री करणाऱ्या देशी-विदेशी दारू अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात छापे टाकले. या छाप्यात २४ जणांना अटक केली, एकूण ७९ गुन्हे दाखल करण्यात आले. आठ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. २१९ लिटर स्पिरीट जप्त केले. या कारवाईसाठी दोन भरारी पथके तैनात केली आहेत. एक पथक जत सीमाभागात कायमस्वरुपी नियुक्त केले आहे, दुसरे पथक जिल्हाभर गस्त घालत आहे.

दारु निर्मिती कारखान्यात सीसीटीव्ही कॅमेरे
जिल्ह्यात देशी व विदेशी दारूची निर्मिती करणाऱ्या इस्लामपूर, शिराळा येथे एका व सांगलीतील दोन अशा चार ठिकाणच्या कारखान्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उत्पादकांकडून दारुत अन्य कोणत्याही रसायनाचे मिश्रण होऊ नये, यासाठी ही दक्षता घेतली असल्याचे अधीक्षक गोसावी यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा ‘कंट्रोल’ जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यात आला आहे. यामुळे उत्पादकांनी दारुचे किती उत्पादन केले, याचीही माहिती मिळू शकते, असेही गोसावी म्हणाले.
गोव्यातून येणाऱ्या रेल्वेची दररोज सांगली किंवा मिरज स्थानकावर तपासणी केली जात आहे. कर्नाटकातून येणाऱ्या एसटी बसेसही तपासल्या जात आहेत. स्वस्तात दारू मिळते म्हणून प्रवासी येताना दारू घेऊन येतात. त्यांनाही पकडले जात आहे. मात्र तपासणी सुरु असल्याचे समजताच प्रवासी रेल्वे ट्रॅकवर बाटल्या टाकून निघून जातात.

Web Title: Look at the liquor smugglers in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.