तासगाव तालुक्यात द्राक्षबागांचे ५२ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:16 AM2021-02-19T04:16:23+5:302021-02-19T04:16:23+5:30
तासगाव : बुधवारी रात्री तासगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी सुटलेल्या वादळी वाऱ्यात तालुक्याच्या पूर्व भागातील ...
तासगाव : बुधवारी रात्री तासगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी सुटलेल्या वादळी वाऱ्यात तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी येथील तीन, सावळज येथील दोन आणि मणेराजुरी येथील एक अशा सहा द्राक्षबागा कोसळून भुईसपाट झाल्या. यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ५२ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने द्राक्षबागांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.
द्राक्षबागांच्या बरोबरच गहू, शाळू, हरभरा, मका तसेच पालेभाज्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी मोठी झाडे वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारी रात्री उशिरा अवकाळी पाऊस सुरू असताना सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे बागेतील स्टेजिंगचा तोल बिघडला. द्राक्षांचे वजन पेलू न शकल्याने तारा तुटून बागा कोसळल्या.
तहसीलदार कल्पना ढवळे व तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर यांनी तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यानंतर तलाठी प्रकाश भोसले, पोपट ओमासे, विद्यासागर चव्हाण, कृषी सहायक एस. व्ही. कुंभार, संजय चव्हाण आणि उत्तम खरमाटे यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत.
चौकट :
वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागा कोसळलेले शेतकरी, क्षेत्र आणि अंदाजे नुकसान
शेतकरी गाव क्षेत्र (गुंठे) नुकसान (लाख)
प्रज्ञा प्रकाश पवार डोंगरसोनी ४० १० लाख
कोंडिराम तुळशीराम हंकारे डोंगरसोनी ३० ७.५ लाख
रमेश ज्ञानोबा झांबरे डोंगरसोनी ४० १० लाख
नितीन शिवाजी तारळेकर सावळज ४० ९ लाख
विष्णू शंकर माळी सावळज ४० ७ लाख
सुभाष शिवराम माळी मणेराजुरी ४० ९ लाख