सांगली : गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने शनिवार, रविवारी दिवसांचा वीकेंड लॅाकडाऊन लावला. त्यामुळे उद्योग, व्यापार, बाजारपेठ सर्वकाही बंद होते. वाहतूक करण्यास परवानगी असली तरी प्रवासीच नसल्याने ५४ बसेस २० हजार ७२४ किलोमीटर धावल्यानंतर तीन लाख २५ हजारांचा एसटीच्या सांगली विभागाला तोटा झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी जिल्ह्यातील दहा आगाराच्या दररोज जवळपास चार ते पाच हजार फेऱ्यांच्या माध्यमातून दोन लाख किलोमीटर अंतरापर्यंत बसेस धावत होत्या. त्यातून एसटीच्या सांगली विभागाला रोज ६० ते ६५ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तसे फेऱ्या कमी झाल्या. त्यामुळे उत्पन्नही कमी झाले. मात्र, वीकेंड लॅाकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला. शनिवारी जिल्ह्यातील दहा आगारांतून ४७ बसेस सोडण्यात आल्या. या एका दिवसात जवळपास १४० फेऱ्या आणि १८ हजार २५६ किलोमीटर बसेस धावल्या. त्यातून पाच लाख ४१ हजार ६१५ रुपये उत्पन्न मिळाले. या बसेसमध्ये ५० टक्केच प्रवासी असल्यामुळे एसटीला दोन लाख ७९ हजार ८६४ रुपयांचा तोटा झाला. प्रवासी नसल्याचे लक्षात आल्यानंतर रविवारी एसटी महामंडळ प्रशासनाने केवळ सात बसेसच्या २२ फेऱ्या आणि दोन हजार ४६८ किलोमीटर अंतर झाले आहे. तरीही बसेसला प्रवासी मिळालेच नसल्यामुळे ३७ हजार ८३४ रुपयांचा तोटा झाला. असे दोन दिवसांत एसटी महामंडळाच्या सांगली विभागाला तीन लाख २५ हजार रुपये तोटा झाला.
चौकट
ज्याची ड्युटी, तोच कामावर
-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य सरकारी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी कामावर बोलविण्यात आले आहेत. एसटीने मात्र प्रशासकीय कामकाजासाठी ५० टक्के उपस्थितीचा नियम केला आहे. ज्याची ड्युटी लावण्यात आलेली आहे, तेच कर्मचारी कामावर येत असल्याचे सांगण्यात आले.
-नियमित कर्मचाऱ्यांनाच सध्या काम दिले जात आहे. नियमित नसणाऱ्यांना पुन्हा काम नसल्यामुळे रोजगार करावा लागेल अशीच परिस्थिती आहे.
कोट
गेल्यावर्षी लॅाकडाऊनमुळे तब्बल तीन महिने एस.टी. बससेवा बंद होती. त्यात महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, दिवाळीपासून एस.टी.चे उत्पन्न वाढले होते. प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढले होते; परंतु आता पुन्हा कोरोनाचे संकट वाढले. हे संकट निवारल्यानंतरच एस.टी.चे उत्पन्न वाढू शकेल.
-अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, सांगली विभाग.
चौकट
-आगारातील एकूण बस संख्या : ७१८
-दोन दिवसांत किती बसेस धावल्या : ५४
-बसेस फेऱ्या संख्या : १६२
-उत्पन्न किती मिळाले? : ६१३२६४