महापूर कृष्णा नदीला... फटका विटा शहराला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:48+5:302021-07-24T04:17:48+5:30

विटा : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा विटा शहराला फटका बसला असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोगाव येथील नदीपात्रातील जॅकवेलला पाण्याने ...

Mahapur Krishna river ... hit Vita city ..! | महापूर कृष्णा नदीला... फटका विटा शहराला..!

महापूर कृष्णा नदीला... फटका विटा शहराला..!

Next

विटा : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा विटा शहराला फटका बसला असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोगाव येथील नदीपात्रातील जॅकवेलला पाण्याने पूर्णपणे वेढा दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासून तेथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विटेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी, शहरातील महापूर ओसरल्यानंतरही कमीत कमी पाच ते सात दिवस पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोयना पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीला महापूर आला आहे. या महापुरामुळे नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे.

घोगाव येथे विटा शहराला पाणीपुरवठा करणारी विटा नगरपरिषदेची पाणी पुरवठा योजना आहे. या योजनेचे मुख्य जॅकवेल व विद्युत ट्रान्सफाॅर्मर नदीपात्राशेजारी आहेत. नदीला आलेल्या महापुरामुळे जॅकवेल व विद्युत ट्रान्सफाॅर्मर पूर्णपणे पाण्यात गेले आहेत. त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित केला आहे. तर शुक्रवारी दुपारी महापुराचे पाणी जॅकवेलमध्ये घुसल्याने विद्युत पंप पाण्याखाली गेले आहेत.

त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासून घोगाव योजना पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिल पवार यांच्यासह कर्मचारी रात्रभर तेथील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. परंतु, घोगाव योजनेचे मुख्य जॅकवेलच पाण्याखाली गेल्याने शहराला पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर किमान पाच ते सात दिवस विटा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे विटा शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे.

चौकट :

पाणी काटकसरीने वापरा...

कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे घोगाव पाणी योजना पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे शहराला पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सात दिवस लागतील. त्यामुळे विटेकर नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रतिभा पाटील व मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी शुक्रवारी केले.

फोटो - २३०७२०२१-विटा-महापूर ०१ ते ०३ : कृष्णा नदीला महापूर आलेल्या विटा शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या घोगाव योजनेचे जॅकवेल व विद्युत ट्रान्सफाॅर्मर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

Web Title: Mahapur Krishna river ... hit Vita city ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.