सांगलीत कृष्णा-वारणा काठाला महापुराचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:47+5:302021-07-24T04:17:47+5:30
२३०७२०२१कोकरूड- वारणा नदीला आलेल्या पुरामुळे शिराळा तालुक्यातील मेणी ओढ्यावरील पूल खचला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोयना आणि ...
२३०७२०२१कोकरूड- वारणा नदीला आलेल्या पुरामुळे शिराळा तालुक्यातील मेणी ओढ्यावरील पूल खचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने जिल्हा पुन्हा एकदा महापुराच्या विळख्यात सापडला आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेने धोक्याची पातळी ओलांडली असून चौदा तासात तब्बल सहा फुटांनी पाणी वाढले. जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार शनिवारी सकाळपर्यंत नदीची पाणीपातळी ५० फुटांवर जाण्याची शक्यता आहे.
कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांतील अनेक गावांत पाणी शिरले आहे. मिरज, पलूस, वाळवा, शिराळा तालुक्यांतील साडेपाच हजार कुटुंबांना घरे सोडावी लागली आहेत. वीस हजार ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी आश्रय घेतला आहे. ८८ गावांना पुराचा फटका बसला आहे. सत्तरहून अधिक गावांचे रस्ते बंद झाले असून पूल पाण्याखाली गेले आहेत. कोयना धरणातून ५३ हजार ३६० क्युसेक, तर वारणा धरणातून २८ हजार २५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. खुद्द सांगलीत पाऊस कमी असला तरी, या विसर्गामुळे नद्यांचा फुगवटा वाढला आहे.
कोयनेचा पाणीसाठा ८५.६६ टीएमसीवर पोहोचला आहे. ३४.४० टीएमसीच्या वारणा धरणात ३२.८६ टीएमसी साठा झाला आहे. अलमट्टीत ८९.२७ टीएमसी पाणीसाठा आहे. ते ७५.५७ टक्के भरले आहे. सध्या अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना पाणलोट क्षेत्र तथा नवजा, महाबळेश्वर आदी परिसरात विक्रमी पाऊस होत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात २४ तासात ६०५ मिलिमीटर पाऊस पडला. नवजामध्ये ७३१ मिलिमीटर पडला. कोयनेत २४ तासात १८ टीएमसी इतका विक्रमी पाणीसाठा झाला. त्यामुळे धरणातून ४५ हजार क्युसेक पाणी सोडावे लागले, सायंकाळपर्यंत विसर्ग ५३ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. पूरप्रवण १०४ गावांतील रहिवाशांच्या स्थलांतरासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी केली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत वाळवा तालुक्यातील पाच हजार, तर महापालिका क्षेत्रासह जिल्हाभरात १० हजार लोकांचे स्थलांतर झाले होते.
दरम्यान, २०१९ मध्ये सांगलीत आयर्विन पुलाजवळ ४५ फूट पाणी पातळी असताना शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी खुद्द प्रशासनानेच ५२ फुटांचा अंदाज वर्तविल्याने पुन्हा महापुराचा तडाखा बसणार हे निश्चित झाले.
चौकट
सांगलीत आज ५० फुटापर्यंत पाणी
कृष्णेची पाणी पातळी शनिवारी सकाळी ५० फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. सांगलीतील पाणी पातळी ४९ फुटापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले की, वाढत्या पाणी पातळीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
चौकट
असे आहे महापुराचे थैमान...
- सांगली - कोल्हापूर बायपास रस्ता पाण्याखाली गेला
- चिकुर्डेसह काही ठिकाणी जनावरे पुरात वाहून गेली.
- डिग्रज व मौजे डिग्रजचा संपर्क तुटला
- सांगली एसटी आगारातील ९८ बसेस तासगाव, इस्लामपूर, मिरज व चंदनवाडी कार्यशाळेत हलविल्या.
- भिलवडी बाजारपेठेत पाणी शिरले, सुखवाडी, चोपडेवाडी, भुवनेश्वरवाडीचा संपर्क तुटला.
- मांगले परिसरात महापुराने २००५ व २०१९ चे विक्रम मोडले.
- वाळव्यात कणेगाव व भरतवाडीत नागरिकांनी जनावरांसह गाव सोडले
- ७० हून अधिक गावांचे रस्ते पाण्याखाली
चौकट
चांदोलीत २४ तासांत ५७४ मि.मी. पाऊस
सांगलीचा महापूर कोयना व चांदोलीतून सोडलेल्या पाण्यावर ठरतो. चांदोलीमध्ये गुरुवारी सकाळपासूनच्या २४ तासात तब्बल ५७४ मिलिमीटर पाऊस कोसळला. धरणातील पाणी पातळी सव्वापाच मीटरने वाढली. पाणीसाठा १३.५ टीएमसीने वाढला. त्यामुळे सांगलीकरांच्या चिंतेत भर पडली.
चौकट
अशी वाढली कृष्णेची पातळी (आयर्विन पूल)...
सकाळी ६ - ३८ फूट, सकाळी ७ - ३८.७ फूट, सकाळी ८ - ३९.३ फूट, सकाळी ९ - ४० फूट, सकाळी १० - ४०.६ फूट, सकाळी ११ - ४१ फूट, दुपारी १२ - ४१.६ फूट, दुपारी १ - ४२.२ फूट, दुपारी २ - ४२.७ फूट, दुपारी ३ - ४२.११, दुपारी ४ - ४३.४, सायंकाळी ५ - ४३.७, सायंकाळी ६ - ४४.१ सायंकाळी ७ - ४४.५ फूट.
चौकट
दुपारपर्यंत २५ रस्ते पाण्याखाली
शुक्रवारी दुपारपर्यंत शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व खानापूर तालुक्यांतील २५ रस्ते पाण्याखाली गेले. ते असे : शिराळा तालुका - कांदे - मांगले पूल, सागाव - मांगरुळ, मांगले - काखे रस्ता. कांदे पूल जोडरस्ता, आरळा पूल, शिंगटेवाडी पूल. वाळवा तालुका - ठाणापुडे पुलाचे जोडरस्ते, येलूरजवळील फरशी पूल, ताकारी - बहे पूल, निलेवाडी गावाजवळ ऐतवडे पूल, शिगाव, अहिरवाडी. पलूस तालुका - आमणापूर पूल, बुर्ली - आमणापूर ओढा, पुणदी पूल, नागठाणे गावाजवळील मौल्याचा ओढा, नागराळे ते शिरगाव फाटा, बम्हनाळ ते भिलवडी. मिरज तालुका - कृष्णाघाट - ढवळी - म्हैसाळ रस्त्यावरील स्वामी नाल्यावरील पूल, मौजे डिग्रज - ब्रम्हनाळ, मौजे डिग्रज - नावरसवाडी, खोतवाडी - नांद्रे. खानापूर तालुका - रामापूरजवळील येरळा नदीवरील फरशी पूल.
चौकट
तालुकानिहाय बाधित गावे...
वाळवा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे अडीच हजारांहून अधिक कुटुंबे पुरामुळे विस्थापित झाली आहेत. २० हजार ३९८ ग्रामस्थांना घरे सोडावी लागली आहेत. शिवाय १५ हजार ३११ जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
मिरज १९ (१६२८ कुटुंबे), पलूस १९ (९२१ कुटुंबे), वाळवा ३७ (२६२४ कुटुंबे), शिराळा १३ (३९४ कुटुंबे).