महाराष्ट्राला पतंगराव खूप काळ हवे होते : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:59 PM2018-03-10T23:59:30+5:302018-03-10T23:59:30+5:30
सांगली : लोकांच्या अडचणीला धावून जाणारे, राजकारणात असूनही दिलदारवृत्तीने जगणारे, अजातशत्रू आणि जगनमित्र असलेल्या पतंगरावांची महाराष्ष्ट्रला अजून खूप काळ गरज होती,
सांगली : लोकांच्या अडचणीला धावून जाणारे, राजकारणात असूनही दिलदारवृत्तीने जगणारे, अजातशत्रू आणि जगनमित्र असलेल्या पतंगरावांची महाराष्ष्ट्रला अजून खूप काळ गरज होती, असे भावुक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वांगी (ता. कडेगाव) येथील शोकसभेत व्यक्त केले.
सोनहिरा सहकारी साखर कारखान्यासमोरील पटांगणावर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी शोकसभा पार पडली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पतंगरावांचे अचानक जाणे मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या निधनाच्या गोष्टीवर अजूनही माझा विश्वास बसत नाही. त्यांचे आणि माझे पारिवारिक संबंध होते. माझ्यावर नेहमीच त्यांचे विशेष प्रेम दिसून आले. विरोधी पक्षात असूनही त्यांना जेव्हा माझे निर्णय चांगले वाटायचे तेव्हा ते कोणताही विचार न करता पाठीवर थाप मारायचे. सातत्याने मला प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. असा हा उमद्या मनाचा माणूस आमच्यासारख्या राजकारण्यांना अजूनही हवा होता. कोणाच्याही अडचणीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्या लोकप्रियतेचे कारण ठरले.
लोकांना सतत हसवत ठेवणे त्यांना जमले. स्वत:ही ते राजकारणात हसत-खेळतच जगले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे कार्य केले ते महाराष्टÑ कदापि विसरू शकणार नाही. शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पतंगराव कदम यांच्याकडे पाहिले जायचे, असे फडणवीस म्हणाले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, पतंगरावांच्या निधनाने माझे डोळे पाण्याने भरून आले आहेत. दलित आणि मराठा समाजाला जोडणारा सेतू म्हणूनच पतंगरावांनी काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर करणारे ते नेतृत्व होते. त्यामुळे कायम ते आदरस्थानी राहिले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, पतंगराव नेहमीच मला लेक म्हणायचे. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मला धीर दिला. अनेक चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन दिले. पापभीरू, निष्पक्ष वृत्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ते नेहमीच आदरस्थानी राहिले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्हाला दु:ख सागरात लोटून पतंगराव निघून गेले. नागपूर अधिवेशनात आमची भेट झाली. दुपारी जेवायला म्हणून ते निघून गेले ते परत आलेच नाहीत. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या आजारपणाची आणि नंतर निधनाची बातमी हे सर्वच धक्कादायक होते. काँग्रेसचे महाराष्टÑाचे प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले की, ही महाराष्ष्ट्रची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे.
अजित पवार म्हणाले की, आर. आर. पाटील, मदन पाटील आणि आता पतंगराव यांच्या निधनामुळे महाराष्ष्ट्रला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. त्यापूर्वी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांसारख्या नेत्यांचे अचानक जाणे चटका लावून गेले. विद्वानांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाºया पुण्यासारख्या शहरात शिक्षण क्षेत्रातील वटवृक्ष फुलवून पतंगरावांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. पतंगराव कदम इतक्या लवकर आमच्यातून जातील, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
जातील तिथे प्रेमाचे चांदणे शिंपले... : प्रा. डॉ. एन. डी. पाटील यावेळी म्हणाले की, पतंगरावांसारखा दिलदार, दिलखुलास माणूस मी पाहिला नाही. जातील तिथे प्रेमाचे चांदणे शिंपीत जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे अनेक माणसे त्यांनी जोडली. रयत शिक्षण संस्थेत आम्ही एकत्रित काम करताना आमचे कधीही मतभेद झाले नाहीत.