कोल्हापूर : ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ म्हणता मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना २५ सभा का घ्याव्या लागतात? महाराष्ट्र मागासलेला आहे, तर पंतप्रधानांसह अर्धा डझन केंद्रीय मंत्री तळ ठोकून का? असा खोचक सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला. मोदींकडे आम्ही १०० दिवसांचा हिशेब मागत नाही, पण त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या कामांचे उद्घाटन मोदी करत आहेत. महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जाण्याची भाषा काही मंडळी वापरत आहेत, हे गुजरातमधील जनतेवर अन्याय नाही का? असा सवालही त्यांनी केला. ‘युपीए’ सरकार असताना कांद्याचे दर पडले, महागाई वाढली तरी शरद पवार यांच्या नावानेच ओरड सुरू असायची, आता ओरड करणारी मंडळी कुठे आहेत. व्यवस्था दोन-चार महिन्यांत बदलत नाही, एवढे आम्हालाही समजते, पण सरकार आल्यानंतर एका शहीद जवानासाठी पाकिस्तानची शंभर डोकी देशात आणू म्हणणाऱ्या सुषमा स्वराज्य आता कुठे आहेत? सीमेवर तणावाचे वातावरण असताना केंद्रातील मंत्री महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात मग्न असल्याची टीकाही त्यांनी केली. केंद्रात सत्तेत राहायचे आणि महाराष्ट्रात अफजलखानाची उपमा देणाऱ्यांनी कोण अफजलखान, याचे उत्तर महाराष्ट्राला द्यावे, अशी उद्धव ठाकरेंवर टीका करत येडियुरप्पासारखे येथे येऊन प्रचार करणार असतील, तर ही मंडळी महाराष्ट्र काय चालविणार, असा सवालही उपस्थित केला. आर. आर. यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवीआर. आर. पाटील यांनी केलेले ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी आहे. याबद्दल शरद पवार यांनीही खंत व्यक्त केली आहे. ‘आर. आर.’ यांनीही दिलगिरी व्यक्त केल्याने हा विषय संपविला पाहिजे. प्रसारमाध्यमांनी हा विषय टोकाचा करू नये, असेही सुळे यांनी सांगितले. माझे व अजितदादांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आम्ही एवढे कोत्या मनाचे नाही. लाल दिव्यासाठी भांडत बसणारे संस्कार आमच्यावर नाहीत. जिथे भाऊ शेजारी नसेल तो लाल दिवा काय कामाचा? असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले.
महाराष्ट्राची अधोगती म्हणता मग २५ सभा का घेता
By admin | Published: October 12, 2014 11:20 PM