महेश मांजरेकर भिलवडी घाटाच्या प्रेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:42 PM2017-12-17T23:42:06+5:302017-12-17T23:44:26+5:30
शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ऐतिहासिक कृष्णाघाट भिलवडी पुलावरून येणा-जाणाºया लोकांना नेहमीच भुरळ घालत असतो. याला अपवाद सिनेमासृष्टीतील कलाकार कसे असतील! प्रसिद्ध सिनेअभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकरही इतिहासप्रसिद्ध कृष्णा नदीवरील घाटाच्या प्रेमात पडले.
कुस्तीवर आधारित असलेल्या ‘केसरी’ या चित्रपटाचे चित्रीकरण भिलवडी येथील कृष्णा घाटावर सुरू होते. यावेळी संथ वाहणारी कृष्णामाई, नदीपात्रात असणारी मंदिरे, काळ्याकुट्ट पाषाणातील तटबंदी, नदीकाठच्या मळीच्या शेतामधील ऊस व केळीची हिरवीगार पिके, उंच असणाºया पुलांवरून चाललेली वाहतूक ही सर्व दृश्ये बघून ते येथील निसर्गात दिवसभर रमले.
ऐतिहासिक कृष्णा घाटावर सुजय डहाके दिग्दर्शित ‘केसरी’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. मांजरेकर यांच्यावर चित्रपटाचा काही भाग येथे चित्रीत करण्यात आला. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये विराट मडके, रुपा बोरगावकर, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी या प्रमुख कलाकारांचा समावेश आहे. चित्रीकरण पन्हाळा, कोल्हापूर, पुण्यासह भिलवडीसारख्या ग्रामीण भागामध्ये झाले आहे. चित्रीकरण अंतिम टप्प्यात आहे.
ग्रामीण भागामध्ये महेश मांजरेकरांसारखा अभिनेता चित्रीकरणासाठी आल्याने त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
मांजरेकरांचा साधेपणा
सिनेकलावंत पडद्यावर कसे असतात व पडद्यामागे कसे, याची उत्सुकता लोकांना जास्त असते. महेश मांजरेकर चित्रीकरण झाले की घाटावर निवांत भारतीय बैठक मारत. आलेल्या नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारीत. त्यांच्यातला साधेपणा लोकांना चांगलाच भावला. आपल्या गावात असणाºया ऐतिहासिक वस्तूचे जतन करण्याचा सल्ला ही भिलवडीकरांना त्यांनी सडेतोडपणे दिला.