माळ बंगला पंप हाऊस बंद पाडले!

By admin | Published: July 24, 2014 10:58 PM2014-07-24T22:58:10+5:302014-07-24T23:11:08+5:30

नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा : शुध्दीकरण न करताच पाणी; पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला

Mal bungalow pump house closed! | माळ बंगला पंप हाऊस बंद पाडले!

माळ बंगला पंप हाऊस बंद पाडले!

Next

सांगली : शहराला अनेक दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर आज (गुरुवार) महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांच्यासह पाच ते सहा नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी थेट माळ बंगल्यावरील महापालिकेच्या पाणी शुध्दीकरण केंद्राला भेट दिली, त्यावेळी पंप हाऊस दोनमधून शुध्दीकरण न करताच शहराला पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील यांना बोलावून घेऊन याचा जाब विचारला. त्यानंतर या पंपहाऊसचे काम बंद पाडले.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सांगली व कुपवाड शहराला गढूळ, मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत आंदोलने सुरू असून, नागरिकांच्याही अनेक तक्रारी नगरसेवकांकडे आल्या होत्या. आज सकाळी अनेक नागरिकांनी महापालिकेत येऊन पाण्यासंदर्भात तक्रारी केल्या. यानंतर सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास महापौर कांबळे, उपमहापौर मजलेकर, नगरसेविका मृणाल पाटील, पुष्पलता पाटील, वंदना कदम, नगरसेवक पांडुरंग भिसे आदींनी महापालिकेतून थेट माधवनगर रस्त्यावरील माळ बंगला येथील जलशुध्दीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी पंप हाऊस दोनमधून शहराला शुध्दीकरण न करताच थेट पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील यांना बोलावून घेतले. यावेळी पाटील यांनी गेल्या चार महिन्यांपासून शुध्दीकरण केंद्र बंद असून, क्लोरीन व तुरटी टाकून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने नदीवरील पंपाने पावसाचे पाणी थेट पंप हाऊसमध्ये येत आहे. यामुळे शहराला गढूळ व मातीमिश्रित पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. पदाधिकाऱ्यांनी जलशुध्दीकरण प्रक्रिया सुरू करूनच शहराला पाणी पुरवठा करण्याचे आदेश पाटील यांना दिले. त्यानंतर पंप हाऊस दोनमधून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. येत्या दोन दिवसांत याची दुरुस्ती करून शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती पाणी पुरवठा अधिकारी सुनिल पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
आयुक्तांकडे तक्रार करणार
यावेळी उपमहापौर पाटील, मजलेकर म्हणाले की, शहराला अपुरा पाणी पुरवठा चालेल; मात्र गढूळ पाणी पुरवठा नको. पाणी पुरवठा विभागाने यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याबाबत आम्ही आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे तक्रार करण्यास गेले होतो; मात्र ते बाहेर गेले होते. उद्या ते आल्यानंतर त्यांच्याकडे तक्रार करणार असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याबाबत सत्तारूढ गटाचे नेते मदन पाटील यांच्याकडेही तक्रार करण्यात आली.
४अशुध्द पाण्याबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया

Web Title: Mal bungalow pump house closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.