मालगावचे दारू दुकान स्थलांतरासाठी ‘गाव बंद’
By admin | Published: October 8, 2015 11:46 PM2015-10-08T23:46:50+5:302015-10-09T00:46:42+5:30
ग्रामस्थ निर्णयाशी ठाम : ‘राज्य उत्पादन’चा खोडा
मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील सरकारमान्य देशी दारूची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करावी, या मागणीसाठी सर्व गाव बंद ठेवण्यात आले. बंदमुळे गावातील व्यवहार दिवसभर ठप्प होते. यावेळी शांतता, सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मालगाव येथे मुख्य रस्त्यावर असणारी दोन सरकारमान्य देशी दारुची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करण्याच्या मागणीवरून दारु दुकान चालकांविरुद्ध ग्रामपंचायत सत्तधारी गटात वाद निर्माण झाला आहे. यापूर्वी व ग्रामपंचायत सत्तांतरानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून सत्ताधारी गटाने दारु दुकाने स्थलांतराच्या विषय लावून धरला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रस्ताव नसल्याने दुकाने स्थलांतराची मागणी फेटाळली आहे. आंदोलनकर्ते मात्र आपल्या मागणीसाठी ठाम आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सत्ताधारी गटाने दुकाने स्थलांतरासाठी दि. ८ रोजी गांव बंदचा निर्णय घेतला. या निर्णयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आक्षेप घेतला. आंदोलन नियमावली असल्याचे ग्रामपंचायतीला कळविल्याने वादात भर पडली. मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी नेते आप्पासाहेब हुळ्ळे, काकासाहेब धामणे, सरपंच प्रशांत माळी, उपसरपंच शशिकांत कनवाडे, प्रदीप सावंत, संजय काटे यांची भेट घेऊन बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)
आंदोलन तीव्र करणार
मालगाव येथील दारु दुकाने मुख्य रस्त्यावर आहेत. याचा ग्रामस्थांना त्रास होतो. दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करावीत, अशी मागणी आहे. या मागणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठपुरावा करूनही हा विभाग दुकान चालकांना पाठीशी घालत आहे. जोपर्यंत दुकाने स्थलांतरित होत नाहीत, तोपर्यंत टप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.