मिरजेतील व्यापारी पांडुरंग जगताप यांच्याकडून पावणेतीन कोटी रुपये किमतीची द्राक्षे खरेदी करून त्यांचे पैसे बुडविल्याप्रकरणी मिरजेत गांधी चाैक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार यांनी आंध्रप्रदेशातून दुर्गा प्रसाद कुणा याला अटक केली आहे. या कंपनीने मुंबई, पुणे, बेळगाव येथील अनेक व्यापारी व शेतकऱ्यांना सुमारे ५० कोटींना फसविल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दुबईतील कंपनीचे सुबिध व आनंद देसाई यांचा साथीदार दुर्गा प्रसाद याने व्यापारी व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. द्राक्षे व इतर फळे दुबईला पाठवून पैसे न देता अनेकांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या कंपनीने मुंबईतही काहीजणांची कोट्यवधीचे बोगस धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने या संशयितांच्या मालमत्ता व बँक खात्याची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कंपनीने मुंबई, पुणे, बेळगाव, मिरज परिसरातील व्यापारी व शेतकऱ्यांची ५० कोटींची फसवणूक झाली असल्याने प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
दुबईतील कंपनीकडून व्यापाऱ्यांना तब्बल ५० काेटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:19 AM