मिरज : एनपीआर व सीएए या अत्यंत विषारी कायद्यांचे मूळ मनुवादात आहे. संविधानाने दिलेला बरोबरीचा दर्जा व हक्क काढून घेऊन सर्वांना गुलाम बनविण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मुस्लिम व बहुजनांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन निवृत्त न्यायाधीश बी. जी कोळसे-पाटील यांनी रविवारी मिरजेत केले.जमात इस्लामी-ए-हिंद व अलायन्स अगेन्स्ट सीएएतर्फे एनआरसी व सीएए या विषयावर मेळावा पार पडला. यावेळी कोळसे-पाटील म्हणाले, आसाममध्ये एनआरसीच्या कपटाच्या खेळात फक्त मुस्लिमांना या देशातून बाहेर करू, असे वाटले होते. मात्र १९ लाख लोक या देशाचे नागरिक नाहीत म्हणून बाहेर काढले. त्यातील दहा लाख दलित आदिवासी आहेत.
भारतापेक्षा पाकिस्तान, बांगलादेशचा जीडीपी जास्त आहे. ते देश आपल्यापुढे जात आहेत. तरीही यावर विचार केला जात नाही. शिवाजी महाराजांनी मनूच्या राज्याला पहिल्यांदा धक्का दिला. भांडणे लावण्यासाठी शिवाजी महाराजांबद्दल कपटाने खोटा इतिहास लिहिला गेला. औरंगजेबानेही छत्रपतींबद्दल चांगले लिहिले आहे.देशात राज्य कोणाचेही असले तरी, चालविणारे मात्र अन्य लोकच असतात. सामान्य लोक याबाबत अनभिज्ञ आहेत. राष्ट्रपतींचे सैन्यदलाचे अधिकार काढून रावत यांना अधिकार देऊन लष्कर व पोलीस मोदींनी ताब्यात घेतले. मोगलांच्या काळात आमची निर्यात क्षमता ३५ टक्के होती, आता दहा टक्के सुद्धा नाही. यावर कधी चर्चा होत नाही. मनुवादी व्यवस्था सर्वांच्या दु:खाचे मूळ कारण बनली आहे. मुस्लिमांनीही आता मौलवींवर विश्वास ठेवून चालणार नाही.सलोख्याचे वातावरण बिघडण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे प्रयत्न सर्वांनीच करायला हवेत. सलोखा बिघडला की कोणाला फायदा होणार, हे आता सर्वांना समजले आहे.यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, प्रा. वाजीदअली खान यांचीही भाषणे झाली. जमाते-इस्लामीचे कासीम मुल्ला, बद्रुद्दीन नालबंद, मुस्ताक अहमद मोहसीन, महंमद बुकसेलर, जनता दलाचे अॅड के. डी. शिंदे, सुमन पुजारी, जमीयते उलेमा-ए-हिंदचे मौलाना जुबेर बेपारी, सय्यद अनस बाबा, साक्षी मगदूम, मुफ्ती जुबेर, इरफान निशानदार, मौलाना गुलाम गौस बंदानवाजी, शंकर पुजारी, डॉ. अब्दुल मन्नान शेख, नामदेव करगणे, उमेश देशमुख, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, अॅड. अमित शिंदे, धनाजी गुरव, नंदा पाटील, डॉ. अमोल पवार उपस्थित होते.