विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झालेली आहे. वारसास्थळांचा वापर चक्क पार्ट्या करण्यासाठी, शेणकुटे लावण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी आणि वाळवण उन्हात घालण्यासाठी होतो आहे. या स्मारकांचा परिसर स्वच्छ, दुरुस्ती व सुशोभित होणे गरजेचे आहे. या स्मारकांकडे स्थानिक लोक, प्रशासन आणि इतिहासप्रेमींचे दुर्लक्ष झाले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांची शिराळा तालुक्यात चार ठिकाणी स्मारके आहेत. मणदूर, आरळा, बिळाशी आणि मांगरूळ या ठिकाणी ही स्मारके उभी करण्यात आली आहेत. आरळा येथे हुतात्मा सुलोचना रामचंद्र जोशी आणि हुतात्मा चांदसाहेब पटवेगार यांचे स्मारक आहे; तर बिळाशीमध्ये हुतात्मा मारुती ज्ञानू पाटील यांचे स्मारक आहे.
मांगरूळमध्ये हुतात्मा धुंडी संतू कुंभार आणि हुतात्मा शंकर भाऊ चांभार या दोन हुतात्म्यांची स्मारके आहेत. या स्मारकांची आजची अवस्था फारच विदारक आहे. आरळा येथील स्मारकात तर चक्क शेणकुटे लावण्यात आली आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. स्मारकाच्या आतील बाजूस बिअरच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. बिळाशी येथील स्मारक हे गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे; तर मांगरूळ येथील स्मारक उपयोगात असल्याचे दिसून आले. या स्मारकांची अवस्था पाहून इतिहासाच्या वारशाचा आपल्याला विसर पडलेला आहे हे निश्चित.
सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१८-१९ मध्ये या स्मारकांची डागडुजी केली आहे. मात्र स्मारकांच्या वापराबद्दलची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि त्या त्या गावातील ग्रामपंचायतीची आहे असे सांगण्यात आले. ही दुरुस्ती चांगल्या पद्धतीने झाली किंवा नाही, ही दुरुस्ती कोणकोणती केली, झालेली दुरुस्ती किती कालावधीसाठी ठेकेदारास बंधनकारक आहे, याचे माहितीफलक येथे लावणे आवश्यक आहे. तालुक्याचा ऐतिहासिक वारसा पाहता तरुण वर्ग, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि इतिहासप्रेमींनी स्मारकांच्या सुशोभीकरण, संवर्धन आणि जतनासाठी पुढे येण्याची गरज आहे.