सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता होत आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याने सभागृहात नगरसेवकांना उपस्थिती बंधनकारक नाही.
कोरोनामुळे महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य सभागृहात व्हिडीओ काॅन्फरन्सिंग व्यवस्था केली जाणार आहे. नगरसेवकांना सभेपूर्वी अर्धा तास लिंक पाठविली जाईल. सभेपूर्वी त्यांना लिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे लागेल. मतदान प्रक्रियेपर्यंत त्यांना ऑनलाईन जोडता येणार आहे. अर्ज माघारीची प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीनेच होईल. ज्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायचा आहे, त्यांना ऑनलाईन माघारी अर्जाचे वाचन करावे लागणार आहे. त्यानंतर नगरसचिवांच्या सोशल मीडियावर तो अर्ज टाकावा लागेल. प्रत्यक्षात सभागृहात अर्ज आणून देण्याचा पर्यायही समोर ठेवण्यात आला आहे. पहिल्यांदा महापौर पदासाठी मतदान होईल. पीठासन अधिकाऱ्यांकडून मतांची नोंदणी झाल्यानंतरच सदस्यांना हात खाली करण्याची मुभा आहे.
चौकट
व्हीपचा तिढा
महापौर निवडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपने आपापल्या सदस्यांना व्हीप बजाविला आहे. काही जणांनी व्हीप घेतला नसल्याचे समजते. व्हीपचे उल्लंघन झाल्यास नगरसेवकपद रद्द होऊ शकते. पण ती प्रक्रियाही किचकट आहे. आधी संबंधित नगरसेवकाबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागेल. तिथे निकाल न झाल्यास नगरविकास विभागाकडे तक्रार होईल. तिथेही न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाता येईल. ही सारी प्रक्रिया वेळखाऊ आहे.