आजोबांच्या स्मरणार्थ नातवाने केला दहा हजार वृक्षलागवडीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:27+5:302021-05-20T04:29:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : करमाळे (ता. शिराळा) येथील ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : करमाळे (ता. शिराळा) येथील ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा रामा पाटील (आबा) यांचे दि. २ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे नातू अमोल बाजीराव पवार (रेठरे हरणाक्ष) यांनी आबांच्या स्मरणार्थ करमाळेमध्ये दहा हजार झाडे लावायचा संकल्प केला आहे. त्यानुसार त्यांनी करमाळे ते औंढी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्याचे काम सुरू केले आहे.
गावातील नागरिकांना झाडांचे वाटप करण्यात येणार आहे. झाडांच्या रूपाने आबा आपल्या कायम स्मरणार्थ राहतील. यावेळी अमर पाटील, सुनील पाटील, राजू कांबळे, हणमंत पवार, मनोज सावंत, ऋषी पाटील, निखिल माने, सचिन कदम, सुभाष साठे उपस्थित होते. याप्रसंगी कृषी अधिकारी आर. एस. कारंडे व ग्रामसेवक राजेश सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
अमोल पवार यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतो. सिमेंटची जंगले वाढत असताना झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. झाडे कमी झाल्यामुळे वातावरणाचे संतुलन बिघडले असल्यामुळे वृक्षलागवड केली पाहिजे, याबाबत अमोल पवार युवकांना नेहमीच मार्गदर्शन करीत आहेत. ते गेली अनेक वर्षे गावामध्ये झाडे लावत आहेत. यावेळी आपल्या आजोबांच्या आठवणी सदैव आपल्या सोबत रहाव्यात म्हणून त्यांनी वृक्ष लावण्याचा संकल्प करून प्रत्यक्षात वृक्षलागवडीला सुरुवात केली आहे.