म्हैसाळ महाविद्यालय गावातच राहावे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायतीच्या दारात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 04:15 PM2022-05-06T16:15:02+5:302022-05-06T16:27:07+5:30
म्हैसाळ : म्हैसाळ महाविद्यालय, म्हैसाळ हे गावातच राहावे यामागणीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायती समोर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आपल्या ...
म्हैसाळ : म्हैसाळ महाविद्यालय, म्हैसाळ हे गावातच राहावे यामागणीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायती समोर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आपल्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आमच्या शिक्षणाच्या आडवे येऊ नका अशा घोषणा देत परीसर दणाणून सोडला. या आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायतीचे सदस्य पुष्पराज केदाररावजी शिंदे-म्हैसाळकर यांनी केले. यावेळी निवेदन घेण्यास विरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे निवेदन स्विकारले.
या निवेदनात म्हटले आहे की, सन २००९-१० पासून म्हैसाळ येथे सेनापती प्रतापराव गूजर शिक्षण संस्था कानडेवाडी संचलित शिवाजी विद्यापीठ संलग्नित म्हैसाळ महाविद्यालय म्हैसाळ या नावाने वरीष्ठ महाविद्यालय सुरू आहे. हे महाविद्यालयाय कासेगाव एज्युकेशन सोसायटी संस्थेकडे वर्ग करण्याच्या प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहेत. हे महाविद्यालय जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. परंतु म्हैसाळ ग्रामपंचायतीकडून कोरोना काळात १४ एप्रिल २०२१ पासून कोव्हिड बांधित रूग्णांसाठी विलगीकरण कक्षा करीता महाविद्यालयाचा ताब्यात घेतला होता.
विलगीकरण कक्ष २६ ऑगस्ट २०२१ रोजी बंद झाले असून अद्यापही प्राचार्य कक्ष व कार्यालय वगळता इतर वर्ग खोल्यांना म्हैसाळ ग्रामपंचायतीकडून कुलपे घालण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीच्या कार्यवाहीमुळे महाविद्यालयाचे सर्व कामकाज ठप्प झाले असून यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सदर शाळेचे वर्ग सुरू करून देण्याची विनंती महाविद्यलायाच्यावतीने करण्यात आली.
पुष्पराज शिंदे-म्हैसाळकरांनी तोडली कुलपे
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुष्पराज शिंदे-म्हैसाळकरांनी महाविद्यायाचे कुलुप तोडून महाविद्यालय सुरू करून दिले आहे. यामुळे सरपंच व त्यांच्या पती यांच्याकडून पोलीस कारवाईची धमकी देण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांसाठी तुरूंगात जायला लागले तरी चालेल पण विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य शिंदे-म्हैसाळकरांनी सांगितले.
राजकारणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गेले अनेक वर्ष महाविद्यालय चांगल्या प्रकारे सुरू आहे. पण ग्रामपंचायत महाविद्यालय सुरू करण्यासाठी जाणीव पूर्वक आडमुठी भूमिका घेत आहे. - डॉ. रिना पाटील, प्राध्यापिका- म्हैसाळ महाविद्यालय
म्हैसाळ महाविद्यालय ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या खोल्या आहेत. त्या ग्रामपंचायतीने सील केले होते. ते सील तोडून महाविद्यालय उघडले आहे. हे बेकायदेशीर आहे. - रश्मी शिंदे -म्हैसाळकर, सरपंच, ग्रामपंचायत म्हैसाळ
प्रत्येक गोष्टीत ग्रामपंचायत अडथळा आणत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावे - ऐश्वर्या पवार, विद्यार्थ्यांनी