राजकारण, समाजकारणातला लढवय्या नेता हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:27 AM2021-03-16T04:27:14+5:302021-03-16T04:27:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राजकारण, समाजकारणात लढायला शिकवितानाच मनाचा मोठेपणा दाखवित, खिलाडूवृत्तीने जगायला शिकविणारा सच्चा नेता हरपला, अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राजकारण, समाजकारणात लढायला शिकवितानाच मनाचा मोठेपणा दाखवित, खिलाडूवृत्तीने जगायला शिकविणारा सच्चा नेता हरपला, अशी भावना विविध मान्यवरांनी सोमवारी शोकसभेत व्यक्त केली.
बिजलीमल्ल, माजी आमदार संभाजी पवार यांच्या निधनानंतर अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याचवेळी शोकसभा पार पडली. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा साखर कारखानदारांविरोधात शड्डू ठोकण्याचे काम संभाजी पवार यांनी केले. शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून त्यांनी शेतकऱ्यांना लढायला शिकविले. आम्हाला त्यांनी मोठे पाठबळ दिले.
वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, राजकारणापलीकडची मैत्री कशी जपायची, हे संभाजी पवारांनी दाखवून दिले. कुस्ती व राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान सांगलीकर कधीही विसरू शकणार नाहीत. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, आमच्या कुटुंबियांचे व त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे राजकीय विचारधारा वेगळी असतानाही त्यांनी हे नाते टिकविले. कुस्ती व राजकीय क्षेत्राच्या इतिहासात त्यांचे कार्य अग्रस्थानी राहील.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, संभाजी पवारांच्या स्मृती, त्यांचे कार्य आपल्याकडे त्यांच्या पश्चात कायम राहणार आहे. कुस्ती व राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही ते अग्रेसर राहिले. त्यामुळेच विविध क्षेत्रातील हजारो लोकांच्या हृदयात त्यांना स्थान मिळाले.
चौकट
आप्पांनी मदत केली
हिंदकेसरी संतोष वेताळ म्हणाले की, संभाजी पवार यांनी माझ्यासारख्या अनेक मल्लांना घडविले, माेलाचे मार्गदर्शन केले. दुष्काळात कुस्ती टिकावी म्हणून कारखानदारांना सांगून मैदाने घेतली. त्यांच्या या गोष्टी कधीच विसरू शकणार नाही.
चाैकट
‘सर्वोदय’चा लढा आम्ही लढू - राजू शेट्टी
राजू शेट्टी म्हणाले की, संभाजी पवार यांचा सर्वोदय कारखान्यावर खूप जीव होता. हा कारखाना दुसऱ्यांच्या ताब्यात जायला नको होता. शेवटपर्यंत संभाजी पवार या कारखान्यासाठी लढले. त्यांच्या पश्चात आम्ही हा लढा पुढे नेण्याचा प्रयत्न करू.