सांगली जिल्ह्यात ४ लाख रुपयांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:43 PM2020-09-25T12:43:19+5:302020-09-25T12:50:42+5:30
सांगली : सांगली जिल्ह्यात ४ लाख १६ हजार १७० रुपयांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ जप्त करुन अन्न व औषध प्रशासन ...
सांगली : सांगली जिल्ह्यात ४ लाख १६ हजार १७० रुपयांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ जप्त करुन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत छापे टाकुन कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत एरंडोली ता. मिरज येथील सुर्यप्रकाश दुध संकलन केंद्र व पाटील मिल्क ॲड मिल्क प्रॉडक्टर या ठिकाणी छापे टाकुन कारवाई करण्यात आली. यामध्ये पाटील मिल्क ॲड मिल्क प्रॉडक्ट, गट नं 1529 एरंडोली ता. मिरज या ठिकाणी म्हैस दुध व गाय दुध यांचे संकलन करुन त्यावर प्रक्रिया केले जात असल्याचे आढळले.
या ठिकाणी दुधात भेसळ करण्यासाठी दुध पावडर व ट्रायसोडियम सायट्रेट वापरत असल्याचा संशय आल्याने रुपये ४ लाख १६ हजार १७० रुपये किंमतीचा १००० लिटर म्हैसचे दुध, ५१५ लिटर गायचे दुध तसेच २१२३ किग्रॅ दुध पावडर, ३० किग्रॅ ट्रायसोडियम सायट्रेटचा साठा जप्त करण्यात आला. दुध नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आले.
पाटील मिल्क ॲड मिल्क प्रॉडक्टस, एरंडोली या डेअरीमध्युन म्हैस दुध, गाय दुध,खवा, पनीर, दुध पावडर व ट्रायसोडियम सायट्रेट यांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यांचे प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झालयानंतर त्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सु. आ. चौगुले यांनी दिली.
सुर्यप्रकाश दुध संकलन केंद्र, एरंडोली या ठिकाणी म्हैस दुध, गाय दुध यांचे नमुने तपासणीसाठी घेतले असुन त्यांचे प्रयोगशाळेकडुन अहवाल प्राप्त झालयानंतर त्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
याठिकाणी वाहनांतुन दुध संकलन केले जाते अशा वाहनांना परवाना/नोंदणी घेणे आवश्यक आहे. ज्यांनी परवाना/नोंदणी घेतलेली नाही त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येत आहे. कारवाई अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुकत सुरेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे, महाजन व नमुना सहायक कावळे यांनी केली.