इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याची बोरगाव (ता. वाळवा) येथील दोन वाहतूक ठेकेदारांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्याविरोधात कारखान्याचे वसुली अधिकारी विजयकुमार शेळके यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. गळीत हंगाम २०१२-१३ मध्ये बोरगाव येथील सय्यद कमाल इनामदार व मोहीत शाहनवाज पटेल यांनी ऊस तोडणीचा करार करून कारखान्याकडून अनुक्रमे ५ लाख २० हजार व १० लाख रुपये उचल घेतली होती. या दोन्ही ठेकेदारांसाठी जामीनदार म्हणून सौ. जयश्रीदेवी विजयसिंह शिंदे, विजयसिंह गणपतराव शिंदे व साक्षीदार म्हणून युवराज अर्जुन फार्णे, भगवान गणपती पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यास तत्कालीन संचालक उदय शिंदे यांनी शिफारस केली होती. यावेळी देण्यात आलेली कागदपत्रेही बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठेकेदारांनी ऊस तोडणी अथवा वाहतुकीचे कोणतेही काम न करता १५ लाख २० रुपयांची रक्कम हडप केली आहे. यामुळे त्यांच्याविरोधात कारखान्याचे वसुली अधिकारी विजयकुमार शेळके यांनी कऱ्हाड पोलिसांत तक्रार अर्ज दाखले आहे. (प्रतिनिधी) निवडणुकीमुळे प्रकरण सध्या बोरगाव येथे बऱ्याच वर्षांनी सोसायटीची निवडणूक लागली आहे. यामुळे वातावरण कमालीचे तापले आहे. कृष्णा कारखान्याचे आजी-माजी संचालक निवडणुकीत सक्रिय आहेत. त्यामुळेच हे प्रकरण आता बाहेर काढल्याची चर्चा बोरगाव येथे आहे.
‘कृष्णा’ कारखान्याची लाखोंची फसवणूक
By admin | Published: October 30, 2015 11:48 PM