मिरज : मिरजेत नशेखोर तरुणांनी पुन्हा एकदा तरुणास मारहाण करून मोबाइल व पैसे जबरदस्तीने काढून घेतले. बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात अमली पदार्थांची नशा करणाऱ्या तरुणांकडून वारंवार लुटमारीचे प्रकार सुरू आहेत.
महिन्यापूर्वी पोलिसांनी अनेक नशेखोरांवर कारवाई केल्याने काही काळ त्यांच्या कारवाया थांबल्या होत्या. मात्र, मंगळवारी पुन्हा रेल्वेस्थानक परिसरात तीन ते चार नशेखोरांनी एका तरुणास मारहाण करून त्याचा मोबाइल आणि पैसे काढून घेतले. लुटमारीचा प्रकार सुरू असताना काही जणांनी त्याचे मोबाइलवर चित्रणही केले. शहरात पुन्हा एकदा गांजा व अमली पदार्थांची नशा करणाऱ्या व्यसनींनी प्रवाशांना व येणा-या-जाणाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. आठवड्यापूर्वी मिरजेत आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण लोहिया यांनी मिरजेतील गांजा तस्कर व विक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र खॉंजा वसाहत व दर्गा परिसर, रेल्वेस्थानक परिसरात गांजाच्या विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने गांजा सहज उपलब्ध होत आहे. नशेखोर तरुणांची गुन्हेगारी कृत्ये सुरूच असल्याने प्रवासी त्रस्त आहेत. बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात नशा करणाऱ्या तरुणांचा उपद्रव कायम आहे. तरुणास मारहाण व लुटमारीबाबत पोलिसांत नोंद नसल्याचे सांगण्यात आले.