Sangli News: क्वाडलाइन स्थानक मिरजेतच होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 05:16 PM2022-12-29T17:16:20+5:302022-12-29T17:35:13+5:30
लोंढा-मिरज-पुणे या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या प्रस्तावित मिरज जंक्शन क्वाडलाइनला सुरुवात होणार
मिरज : हुबळी-सोलापूर-कोल्हापूर या मार्गावर प्रस्तावित क्वाडलाइन स्थानक मिरज स्थानकाच्या दक्षिणेला होणार आहे. गेली अनेक वर्षे प्रस्तावित असलेला हुबळी-सोलापूर-कोल्हापूर क्वाडलाइन सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली असून, हा प्रस्तावित मार्ग मिरज स्थानकाच्या दक्षिणेस बेळगाव गेटपासून सुरुवात होऊन कोल्हापूर लाइनच्या धामणी गेटला जोडण्यात येईल. या त्रिकोणी मार्गात ‘मिरज जंक्शन बी’ असे स्थानक उभारण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दिली.
सध्याच्या मिरज जंक्शनमधून या स्थानकात जाण्यासाठी फुट ओव्हरब्रिज बांधण्यात येईल. नवीन होत असलेल्या बेळगाव गेट उड्डाणपुलापासून रस्ते वाहतुकीसाठी मार्ग देण्याचा प्रस्ताव असून, हुबळी-सोलापूर हा मार्ग नागपूर रत्नागिरी महामार्गावर असलेल्या बेळगाव रेल्वे ब्रिज ते पंढरपूर रेल्वे ब्रिजमधून क्वाडलाइन टाकण्यात येणार आहे. हे दोन्ही मार्ग एकूण सुमारे १० किमीपर्यंत आहेत.
ही क्वाडलाइन सध्या मालगाडी वाहतुकीसाठी असेल कारण रेल्वेला मालवाहतुकीतून जास्त उत्पन्न मिळत असल्याने देशभरात रेल्वे मालवाहतुकीला जास्त महत्त्व देत आहे. यासाठी नवे जलदमार्ग बनविण्याचे काम रेल्वेकडून सुरू असून, त्यातलाच मिरज जंक्शन कॉर्डलाइन हा एक भाग आहे. लोंढा-मिरज-पुणे या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या प्रस्तावित मिरज जंक्शन क्वाडलाइनला सुरुवात होणार असल्याची माहिती भोरावत यांनी दिली.