मिरजेत जिमच्या संख्याबळाने तालमी होताहेत चितपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:44 AM2019-12-29T00:44:42+5:302019-12-29T00:47:47+5:30
मिरजेत केवळ कोरे तालमीत मल्लविद्या प्रशिक्षणासाठी चांगला प्रतिसाद आहे. सकाळ-संध्याकाळ सत्रात या तालमीत सुमारे ५० मुले कुस्तीच्या आखाड्यात उतरून जोर-बैठका, गदा व कुस्तीचे धडे गिरवितात. पडझड झालेल्या तालमीच्या जुन्या इमारतीत गेली २० वर्षे मलगोंडा पाटील तरुणांना कुस्तीचे धडे देत आहेत.
सदानंद औंधे ।
मिरज : मिरजेत स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या तालमींची दुरवस्था झाली आहे. मिरजेतील पाटील तालमीचे मल्ल बापू बेलदार यांनी देशातील पहिला हिंदकेसरी होण्याचा बहुमान मिळविला होता; मात्र बदलत्या काळात जिमची संख्या वाढत असून, काही तालमी वगळता अन्य तालमी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
मिरजेत १८६७ मध्ये भानू तालीम, १९०१ मध्ये अंबाबाई तालीम, १९३८ मध्ये पाटील तालीम या स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या तालमींसह ब्राह्मणपुरीतील हरबा तालीम, संभा तालीम, कोकणे गल्लीतील कोकणे तालीम, तानाजी चौकातील गवंडी तालीम, नदीवेस परिसरातील कोरे तालीम, मंगळवार पेठेतील झारी तालीम, गोठण गल्लीतील छत्रे तालमीत, किल्ला भागातील छोटू वस्ताद तालमीत, मल्लिकार्जुन मंदिरातील मल्लिकार्जुन तालमीत युवकांना मल्ल विद्येचे प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र यापैकी छोटू वस्ताद, मल्लिकार्जुन व छत्रे तालीम बंद पडली आहे.
गवंडी तालमीची पडझड झाली आहे. कुस्ती प्रशिक्षणाला प्रतिसाद नसल्याने झारी तालीम व अंबाबाई तालमीत जिम सुरू झाली आहे. भानू तालीम व अंबाबाई तालीम संस्था या तालमीतील खेळाडू मात्र राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. भानू तालमीतील खेळाडूंनी मल्लखांब या क्रीडा प्रकारात देशपातळीवर पदके मिळविली आहेत. कुस्ती मैदानांचे आयोजन करणाऱ्या अंबाबाई तालीम संस्थेने शैक्षणिक क्षेत्रातही यश मिळविले आहे. मिरजेतील अनेक तालमींची दुरवस्था आहे. हरबा तालीम येथे धार्मिक, सण उत्सव साजरे केले जातात. हरबा तालमीत व्यायामासाठी युवकांची नियमित उपस्थिती आहे.
जिमसाठी अनुदान मिळत असल्याने राजकीय मंडळींच्या संस्थांनी जागा, नवीन इमारत, जिमसाठी साधने मिळविली. शहरात अनेक जिम सुरू झाल्या असून, याठिकाणी व्यायामासाठी पैसे मोजावे लागतात. जिममध्ये जाण्याची फॅशन असल्याने नवीन कुस्तीपटू व पैलवानांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे.
मिरजेत केवळ कोरे तालमीत मल्लविद्या प्रशिक्षणासाठी चांगला प्रतिसाद आहे. सकाळ-संध्याकाळ सत्रात या तालमीत सुमारे ५० मुले कुस्तीच्या आखाड्यात उतरून जोर-बैठका, गदा व कुस्तीचे धडे गिरवितात. पडझड झालेल्या तालमीच्या जुन्या इमारतीत गेली २० वर्षे मलगोंडा पाटील तरुणांना कुस्तीचे धडे देत आहेत.
- वीस वर्षांत एकही नवी तालीम नाही!
जुन्या मोडकळीस आलेल्या तालमीच्या इमारतींची दुरूस्ती, रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. बंद पडलेल्या तालमींच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये व कोणाच्या ताब्यात जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मात्र दरवर्षी नवीन जिम सुरू होत आहेत. मात्र मिरजेत गेल्या वीस वर्षांत एकही नवीन तालीम स्थापन झालेली नाही.
- मिरजेला कुस्तीची मोठी परंपरा
देशातील पहिले हिंदकेसरी बापू बेलदार, संस्थान काळातील मल्ल छोटू वस्ताद, भानू तालमीचे मल्ल माणिकराव यादव, बाबगोंडा पाटील, भारतीय आॅलिम्पिक सामन्यात पदक मिळविणारे शंकर आमटे, रामचंद्र पारसनीस, सुरेश आवळे, मैनुद्दीन हंगड, यल्लाप्पा कबाडे, बद्रुद्दीन हंगड, संजय गवळी या जुन्या काळातील मिरजेतील मल्लांनी देशभरात मैदाने गाजवली. मिरजेचे संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन यांच्या प्रोत्साहनामुळे मिरजेत अनेक तालमींची स्थापना झाली. श्रीमंत पटवर्धन यांनी किल्ला भागात सरकारी तालीम स्थापन केली होती.