म्हैसाळ भ्रूण हत्याकांडातील दोघांचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:10 PM2017-10-14T15:10:14+5:302017-10-14T17:46:20+5:30
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांड प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब आप्पासाहेब खिद्रापुरे (वय ४२, रा. म्हैसाळ), गर्भलिंग निदान करणारा डॉ. रमेश व्यंकटेश देवगिरीकर (६४, विजापूर) या दोघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फेटाळले.
सांगली, दि. १४ : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांड प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब आप्पासाहेब खिद्रापुरे (वय ४२, रा. म्हैसाळ), गर्भलिंग निदान करणारा डॉ. रमेश व्यंकटेश देवगिरीकर (६४, विजापूर) या दोघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फेटाळले.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपातावेळी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर भ्रूणहत्येचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याने जिल्हयासह राज्यात खळबळ उडाली.
म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचे उघड होताच पोलिसांनी रुग्णालयावर छापे टाकले. पोलिस तपासादरम्यान ओढ्यात १९ अर्भकांचे अवशेष प्लॅस्टिकच्या पिशव्यांत सापडले.
खिद्रापुरे याच्या रुग्णालयातून कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. खिद्रापुरेला अटक केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती कर्नाटकातील कागवाड, विजापूरपर्यंत वाढली. याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. शिवाय केंद्रीय चौकशी समितीनेही चौकशी केली
खिद्रापुरेने त्याच्या रुग्णालयात गर्भपात केलेले १९ अर्भक म्हैसाळ येथील ओढ्यालगत असलेल्या मोकळ्या जागेतून जप्त केले होते. हे अर्भक दफन केले होते. या अर्भकांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यातील काही अर्भक कुजलेल्या अवस्थेत होते. एकूण ९ पैकी आठ अर्भकांचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात ५ पुरूष जातीचे, तर ३ स्त्री जातीचे अर्भक होते.
याप्रकरणी खिद्रापुरेसह १४ जणांना अटक करण्यात आली होती. यातील एक-दोघे सोडले तर सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. खिद्रापुरे व देवगीकर यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांच्या न्यायालयात वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने दोघांचाही जामीन फेटाळला.