शिराळा पश्चिम भागात मोबाईल नॉट रिचेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:27 AM2021-04-27T04:27:45+5:302021-04-27T04:27:45+5:30
कोरोना महामारीच्या संकटात गतवर्षीपासून शाळा महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण कार्यक्रम सुरू आहे; पण रेंज नसल्याने डोंगरकपारीतील वाड्या-वस्त्यावरील मुलांना या ...
कोरोना महामारीच्या संकटात गतवर्षीपासून शाळा महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण कार्यक्रम सुरू आहे; पण रेंज नसल्याने डोंगरकपारीतील वाड्या-वस्त्यावरील मुलांना या शिक्षणाचा फायदा होत नाही.
केंद्र सरकारने सर्वसामान्यांसह सर्वांचेच काम कमी वेळेत व्हावे, या हेतूने ऑनलाइन सुविधा सुरू केल्या आहेत. यासाठी नागरिकांनीही विविध मोबाइल कंपन्यांचे फोर जी पॅकेज घेतले. परंतु, ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेटवर्कच मिळत नसल्याने मोबाइल कंपन्यांकडून घेतलेल्या पॅकेजचे पैसे वाया जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. मोबाइलला योग्य रेंज मिळत नसल्याने ग्राहकांना ऑफलाइन सुविधा घेण्याची वेळ येते.
तालुक्यात सध्या अनेक नामवंत कंपन्यांची मोबाईल सेवा कार्यरत आहे. मात्र अपवादवगळता काही कंपन्यांनी ग्राहकांची लूट चालू केली आहे. फाेर जीच्या नावाखाली अनेक वेळा टूजी व थ्रीजीचीही रेंज मिळत नाही. डिजिटल इंडियाचा पुरता बोऱ्या वाजला आहे. या भागात अनेक कंपन्यांनी स्थानिक कर अथवा शासकीय महसूल बुडविण्यासाठी एकाच टॉवरवर चार-चार कंपन्यांचा घरोबा मांडला आहे. कंपन्यांनी टाॅवर सखल भागात बसविलेत. त्यामुळे नेटवर्क मिळत नाही. शासनस्तरावर याची दखल घेऊन सर्वच गावात मोबाईल रेंज मिळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
----------------------------------------
चौकट
टॉवर डाेळ्यांसमाेर पण रेंज नाही..
पश्चिम विभागातील मणदूर येथे विविध कंपन्यांनी टाॅवर सखल भागात उभा केले आहेत. पण मणदूरशिवाय अन्य कोणत्याही गावांत रेंज मिळत नाही. हाकेच्या अंतरावर सोनवडे, जाधववाडी, मिरूखेवाडी, धनगरवाडा या गावानाही रेंज मिळत नाही. सध्या आठ दिवसांपासून डोंगरमाथ्यावर खोतवाडी येथे एका खासगी कंपनीचा टाॅवरही कार्यान्वित करण्यात आला. सोनवडे, जाधववाडी, मिरूखेवाडी, धनगरवाडा, कोळेकरवाडी, विनोबाग्राम या गावांतून तो समोर दिसतोय पण त्याचीही रेंज मिळत नाही. शासनाने या खासगी कंपन्या ना पर्यायी छोटे छोटे टाॅवर गावागावांत उभे करण्यास भाग पाडावे.