उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम
जो दहकती आग के शोलौं पर सोया वे हुसैन
जिसने अपने खून से आलम को धोया वो हुसैन
जिसने सब कुछ खो के फिर भी न कुछ खोया वो हुसैन
इस्लामिक वर्षाची सुरुवात मोहरम या महिन्याने होते. मोहरमला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आजपासून १३४१ वर्षांपूर्वी मोहरमच्या १० तारखेला हजरत महंमद पैगंबर (स.स.) यांचे नातू इमाम हुसैन यांनी इस्लाम वाचवण्यासाठी स्वत: व आपल्या ७२ अनुयायांचे बलिदान दिले होते. त्या बलिदानाची आठवण म्हणून हजरत इमाम हुसैन (रह.) यांना मानणारे फक्त मुस्लिमच नव्हे, तर हिंदू लोकसुद्धा पूर्ण भक्तिभावाने मोहरम साजरा करतात. यामुळे या सणाला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
इराकपासून १२० किलोमीटर अंतरावर करबला नामक एक ठिकाण आहे. मुस्लिम विद्वानांच्या मते, हे एक ठिकाण्याचे नाव नसून येथील माती साक्ष आहे ती म्हणजे इस्लामिक वर्षातील सर्वांत मोठ्या युद्धाची. जिथे अत्याचारांनी सीमा गाठली, तेथील हवा साक्षी आहे त्या यजीदच्या निर्दयी क्रूर निर्णयांची जिथे सहा महिन्यांच्या अलीअजगर (र.ह.) यांना पिण्यासाठी पाणी दिले नाही.
मुस्लिम विद्वानांच्या मते, महंमद पैगंबरांच्या (स.स.) नंतर शत्रूंनी पैगंबरांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याचा इरादा केला होता. हजरत अली (रह.) व हजरत इमाम हसन (रह.) यांच्या शहादत नंतर शत्रूंनी आपला मोर्चा हजरत इमाम हुसैन (रह.) यांच्याकडे वळवला.
पैगंबरांच्या परिवाराला संपवण्याचा कट मक्का मदिन्यामधून कर्बलापर्यंत पोहोचला. यजीद जो स्वत:ला खलिफा समजत होता त्याने हजरत इमाम हुसैन (रह.) यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याचं म्हणणं होतं की, जर इमाम हुसैन त्याला खलिफा स्वीकारतील तर इस्लाममध्ये त्याचा पगडा निर्माण होईल व त्यामुळे इस्लाममध्ये त्याला पाहिजे तसे तो बदल करू शकेल; परंतु या यजीदच्या विचाराला हजरत इमाम हुसैन (रह.) यांनी नकार देऊन त्याला खलिफा मानण्यास मनाई केली.
इमाम हुसैन (रह.) यांना कुफा येथे तेथील लोकांच्या विनंतीनुसार व हजारो पत्राद्वारे विनंती करून हजरत इमाम हुसैन (रह.) यांना कुफा येथे बोलवले होते. जेव्हा हजरत इमाम हुसैन (रह.) करबला पोहोचले तेव्हा त्यांच्या परिवाराबरोबर काही लोक होते. त्यावेळी त्यांना करबला या ठिकाणी रोखण्यात आले व त्यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी यजीदच्या हजारोच्या संखेने असलेल्या लष्कराने तिथे असणाऱ्या पाण्यावर पहारा बसवण्यात आला व त्यांना यजीदला खलिफा माना अन्यथा युद्धाला तयार राहण्याचे आव्हान देण्यात आले. हजरत इमाम हुसैन (रह.) यांना माहीत होते की, यजीदचे लष्कर सर्व हत्यारांसहीत लाखोंच्या संख्येने आहे. त्या तुलनेत त्यांच्याकडे कमी लोक आहेत, पण यजीद नावाच्या आतंकवाद्याचा दबाव झुगारुन त्यांनी आपल्या दिनवर कायम राहणे पसंद केले जो दिन त्यांच्या आजोबा (नाना) हजरत महंमद पैगंबर (स.स.) यांनी प्रस्थापित केला होता.
याचबरोबर यजीदचे अत्याचार वाढत गेले; परंतु हजरत इमाम हुसैन (रह.) यांच्या काफिलाचा आपल्या इराद्यावर कायम राहिला व मोहरमच्या ९ तारखेला हजरत इमाम हुसैन (रह.) यांनी आपल्या समूहातील लोकांना सांगितले की, शत्रूकडे मोठी ताकद आहे. जर आपल्यातील कोणी समूह सोडून जाणार आहे त्यांनी जावे, पण समूह हजरत इमाम हुसैन (रह.) यांच्याबरोबर ठाम राहिले.
एक एक करत हजरत इमाम हुसैन (रह.) यांच्या कुटुंबातील लोक शहीद होत गेले. हजरत इमाम हुसैन (रह.) युद्धासाठी गेले. त्यावेळी मोहरमची दहा तारीख व शुक्रवार होता. इमाम हुसैन (रह.) आपल्या युद्धामध्ये जुमानत नाही हे पाहून यजीद सैनिकांनी ते ज्यावेळी नमाज पढत असताना त्यांना शहीद केले. त्यांच्या स्मृतीत आजही लोक ताजिया, ताबूत, पीर बसवतात. ही हजरत इमाम हुसैन यांची निशाणी मानली जाते.