तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श, माय-लेकीचा जागीच मृत्यू; सांगलीतील कुरळप येथील दुर्दैवी घटना
By शीतल पाटील | Published: July 3, 2023 07:29 PM2023-07-03T19:29:56+5:302023-07-03T19:32:15+5:30
अन् सुदैवाने मुलगा बचावला
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथे तुटलेल्या विद्युत तारेस स्पर्श हाेऊन विजेचा जाेरदार धक्का बसल्याने वंदना विश्वास माळी (वय ४५) व माधुरी विश्वास माळी (वय २०) या माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. २ जुलै राेजी सायंकाळी ६ वाजता घडली.
वंदना माळी यांची कुरळप येथे वशी हद्दीवर शेती आहे. त्यांच्या पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुलगी माधुरी, संजीव व सुरेश या दाेन मुलांसह त्या शेतातील घरात राहत हाेत्या. रविवारी दुपारी ४ वाजता त्या माधुरीसह शेतात टाेकणीसाठी गेल्या हाेत्या. टाेकण करून सायंकाळी सहा वाजता त्या घरी परतत हाेत्या. यावेळी वाटेत तुटून पडलेली वीजवाहक तार त्यांना दिसली नाही. या तारेला स्पर्श होताच माधुरीला विजेचा जाेरदार धक्का बसला. हे पाहून वंदना तिला वाचविण्यासाठी धावल्या. त्यांनाही विजेचा धक्का बसला. जागीच दाेघींचाही मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या कुत्र्याचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
उशिरापर्यंत आई व बहीण घरी न आल्याने मुलगा संजीव त्यांना शाेधण्यासाठी गेला. यावेळी शेताच्या बांधावर दाेघीही निपचित पडल्याचे दिसले. त्याने वंदना यांना स्पर्श केला असता त्यालाही विजेचा धक्का बसला; मात्र हातात लाकडी काठी असल्याने बाजूला फेकला गेल्याने तो बचावला.
माधुरी सध्या पदवीचे शिक्षण घेत होती. रविवारी महाविद्यालयास सुटी असल्याने आईला मदत म्हणून ती शेतात टोकणीसाठी गेली होती. वंदना यांच्या पश्चात संजीव व सुरेश ही दोन मुले आहेत. आई व बहिणीच्या निधनाने दोन्ही भावांचा आक्रोश उपस्थितांचे हृदय हेलावून टाकत हाेता.