गुडेवारांनी पुन्हा अपमान केल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:22 AM2021-04-03T04:22:38+5:302021-04-03T04:22:38+5:30
सांगली : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील निरीक्षक राहुल तारळकर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी अपमानास्पद वागणूक ...
सांगली : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील निरीक्षक राहुल तारळकर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने राजीनामा देतानाच आत्महत्येचाही इशारा दिला होता. याप्रकरणी जिल्हा परिषदेतील सर्वच कर्मचारी संघटना एकवटल्या असून, त्यांनी गुडेवार यांनी कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेत कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख बजरंग संकपाळ, कार्याध्यक्ष व लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील, सचिव दत्ता शिंदे, प्रशासन अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद तारळकर, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सागर बाबर, विनायक जाधव, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी, अनिल वासुदेव आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन समाजकल्याण विभागातील राहुल तारळकर यांच्याबाबत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. चंद्रकांत गुडेवार यांनी अपमानास्पद वागणूक आणि कारवाईचा इशारा दिल्यामुळे तारळकर यांनी राजीनामा देण्यासह आत्महत्येचा प्रयत्न केला. हा गंभीर प्रकार असल्यामुळे तुम्ही यामध्ये लक्ष घालून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका संघटना पदाधिकाऱ्यांनी मांडली. मार्च एंडच्या घाईगडबडीत कर्मचारी वेळेचा विचार न करता, अखंडित काम करत आहेत. तरीही एखाद्या कर्मचाऱ्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपमान होत असेल तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा यावेळी संघटनांनी दिला.
त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी समाजकल्याण विभागातील प्रकरणाची माहिती घेऊन वाद संपविण्यात येईल, असे आश्वासन दिले.