अशोक पाटील
इस्लामपूर : नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीतून तिसऱ्या फळीतील उच्चशिक्षित कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार सुरू आहे. जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या विकासकामांच्या प्रगती पुस्तकाचे परीक्षण केले जात आहे. यामध्ये बहुतांशी नगरसेवक उत्तीर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे उच्चशिक्षित, व्यावसायिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवकांना संधी देण्याचा विचार आतील गोटात सुरू आहे.
विद्यमान नगरसेवकांमध्ये वैशाली सदावर्ते, जयश्री पाटील, मनीषा पाटील, जयश्री माळी, सविता आवटे, सुनीता सपकाळ, संगीता कांबळे, जरिना पुणेकर या महिलांचा समावेश आहे. अपवाद वगळता बहुतेकजणींचे पती किंवा नातेवाईकच कारभार पाहतात. यापैकी किती नगरसेविका पालिका निवडणुकीत उतरणार, हे गुलदस्त्यात आहे. पक्षबांधणी आणि उमेदवार निवडीत जयंत पाटील स्वत: लक्ष घालणार असल्याचे सांगितले जात आहे.
कार्यक्षम कोण, यावर मंथन सुरू
डॉ. संग्राम पाटील, संजय कोरे, बशीर मुल्ला, विश्वनाथ डांगे, दादासाहेब पाटील, आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील या नगरसेवकांपैकी पालिकेच्या कारभारात कोणकोण कार्यक्षम आहे, यावरही राष्ट्रवादीत मंथन सुरू आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची पुनर्बांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.