खासदार संजय पाटील यांच्या कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासुन आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयावर मोर्चा, शहरात भीक मांगो आंदोलन, मुंडण आंदोलन करण्यात आले. 'स्वाभिमानी'च्या रेट्यापुढे खासदार संजय पाटील झुकले. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे, असे मत आंदोलन मागे घेतल्यानंतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केले.
तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याच्या हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे ऊस बिल गेल्या सहा महिन्यांपासून थकीत आहे. या बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तीन - तीन वेळा आंदोलने केली होती. मात्र कारखाना प्रशासन व खासदार संजय पाटील शेतकऱ्यांना दाद देत नव्हते. त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी मंगळवारपासून पाटील यांच्या तासगाव येथील संपर्क कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तत्पूर्वी तासगाव शहरातून मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शहरातून खासदार पाटील यांच्या नावाने भीक मागण्यात आली. भीक मागून जमलेल्या भाजी - भाकरीत आंदोलकांनी आपली गुजराण केली. तिसऱ्या दिवशी सुमारे ५० शेतकऱ्यांनी मुंडण करून खासदार संजय पाटील यांना केस दान केले. विशेष म्हणजे यावेळी उषाताई जगताप या महिला शेतकऱ्यानेही मुंडण केले. आंदाेलक शुक्रवारी शहरातून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढणार होते. दररोज वेगवेगळी आंदोलने करून तीव्रता वाढवण्यात येत होती.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेऊन पाटील यांनी शेतकऱ्यांना पुढील तारखेचे धनादेश देण्याचे आदेश कारखाना प्रशासनाला दिले होते. त्यानुसार शुक्रवारी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ८ ऑगस्टनंतरचे धनादेश देण्यात आले. यानंतर गेल्या चार दिवसांपासून सुरू असणारे आंदोलन मागे घेण्यात आले.
चाैकट
अन्यथा पुन्हा आंदाेलन
संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे. स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी आणि खासदार संजय पाटील यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर पुढील तारखेचे चेक घेऊन हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जर हे धनादेश वटले नाहीत तर पुन्हा रस्त्यावर उतरू.