मुंबई - पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:22 AM2021-04-03T04:22:31+5:302021-04-03T04:22:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज अडीचशेपेक्षा अधिक कोरोना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज अडीचशेपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबई - पुण्यातून दररोज दीड ते दोन हजार नागरिक जिल्ह्यात येतात. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढू लागली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्हा व महापालिका प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तरीही रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढू लागली आहे. आठवड्यापूर्वी १०० ते १५० च्या घरात असलेली रुग्णसंख्या आता दररोज अडीचशे पार गेली आहे. त्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मुंबई, पुण्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे या शहरातून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्याही सध्या वाढली आहे. या नागरिकांतून कोरोनाचा पसार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या प्रवासी नागिरकांवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. एकूणच रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्याची चिंता मात्र वाढू लागली आहे.
चौकट
एसटी बसस्थानक
सांगली येथील मु्ख्य एसटी बसस्थानकातून मुंबई, पुणे या शहरासाठी दिवसभरात २० हून अधिक बसेस धावतात. कोरोनामुळे जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. पण, मुंबई, पुण्याहून सांगली जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या दररोज एक हजारहून अधिक प्रवासी जिल्ह्यात येत आहेत.
चौकट
रेल्वे स्थानक
सांगली - मिरज रेल्वे स्थानकातून दररोज ११ रेल्वे गाड्या धावतात. त्यातील मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी, कोयना, हुबळी दादर एक्स्प्रेस आहेत. रेल्वेतून दररोज ५००हून अधिक प्रवासी जिल्ह्यात येत आहेत. तर मुंबई - पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र घटली आहे. उत्तरेकडील गाड्या मात्र वेटींगवर आहेत.
चौकट
ट्रॅव्हल्स
कोरोनामुळे खासगी बसने प्रवासी करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. पण, मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी बसने जिल्ह्यात परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. खासगी बसेसमधून दररोज २०० हून अधिकजण जिल्ह्यात येत आहेत. ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात आहे.
चौकट
बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही
१. मुंबई, पुण्यासोबत राज्यातील कोणत्याही शहरातून सांगलीत येणाऱ्या प्रवाशांची एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी करण्यात येत नाही. त्याबाबत प्रशासनाकडून नियोजन हाती घेतले आहे.
२. कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक केला आहे. पण, कर्नाटकातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना मात्र कोणतेच बंधन नाही.
३. दिल्ली, कोलकत्ता, उत्तरप्रदेश या उत्तर भारतातून गलाई बांधव मोठ्या संख्येने गावाकडे परतत आहेत. पण त्यांचीही चाचणी केली जात नाही. बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही.