मिरज : स्व. मदनभाऊ पाटील स्मृती मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अवयवदानाचे महत्त्व सांगणाऱ्या मुंबईच्या 'द स्टार' या एकांकिकेने स्व. मदनभाऊ महाकरंडक पटकावला. ‘मोठा पाऊस आला आणि’ या एकांकिकेस द्वितीय तर अ..य.. या एकांकिकेस तृतीय क्रमांक मिळाला. बेड टाईम व शेवट तितका गंभीर नाही या दोन एकांकिकांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.विजेत्या संघांना मिरजेत खा. संजयकाका पाटील यांच्या हस्ते व महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील व आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत पारितोषिक देण्यात आले.महापालिकेतर्फे आयोजित स्व. मदनभाऊ पाटील स्मृती महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहात पार पडल्या. प्रथम क्रमांकास रोख १ लाख रुपये बक्षीस व मानाचा मदनभाऊ महाकरंडक व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रोख ५० हजार, करंडक व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांकास रोख २५ हजार करंडक व प्रशस्तीपत्र देण्यात आले. कोरोना साथीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर झालेल्या स्पर्धेत राज्यातून कोल्हापूर, मुंबई, डोंबिवली, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कल्याण, रत्नागिरी, सांगली, मिरज येथील २५ नाट्यसंस्था सहभागी होत्या.यामध्ये अवयव दानाबाबत जिराफ थिएटर मुंबई यांनी सादर केलेल्या द स्टार या हृदयस्पर्शी एकांकिका विजेती ठरली. रंगयात्रा इचलकरंजी या संस्थेची मोठा पाऊस आला आणि ही एकांकिका द्वितीय व नाट्यमल्हार अहमदनगर या संस्थेची अ..य या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. निष्पाप कलानिकेतन इचलकरंजी यांची बेड टाईम व समांतर सांगली यांची शेवट तितका गंभीर नाही या एकांकिकांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. प्रभाकर वर्तक, रमेश भिशीकर, डॉ. स. नो. मोने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
मदनभाऊ करंडक एकांकिका स्पर्धेत मुंबईचा 'द स्टार' विजेता, २५ नाट्यसंस्था झाल्या होत्या सहभागी
By शीतल पाटील | Published: September 27, 2022 6:08 PM