मिरज : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल मिरजेत अनेक दुकाने व हाॅटेल्सवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली.
मिरजेत देशी दारू, मद्यविक्री करणाऱ्या बारमध्ये गर्दी झाल्याने व पार्सलची परवानगी असताना हॉटेलात ग्राहक सापडल्याने प्रत्येकी पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. छत्रपती शिवाजी रस्त्यावर रहमतुल्लाह, सिगल यासह चार हाॅटेल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंड न भरणाऱ्या दुकानदार व हाॅटेलचालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता उघड्या असलेल्या इतर दुकानचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ग्राहकांची गर्दी, पार्सल सुविधेचा फलक न लावणे, चहाची दुकाने, तसेच काही हॉटेल्ससमाेर गर्दी दिसून आल्याने कारवाई करण्यात आली. बँक ऑफ इंडियासमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी गर्दीबाबत जबाबदार धरून बँक व्यवस्थापकावरही कारवाईचा इशारा दिला. पोलीस बंदोबस्तात महापालिका सहायक आयुक्तांच्या पथकाने केलेल्या कारवाईवेळी व्यापाऱ्यांसोबत वादावादीचे प्रकार घडले.