जागतिक निविदा काढून महापालिकेने लस खरेदी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:28 AM2021-05-19T04:28:14+5:302021-05-19T04:28:14+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे वेळेत लसीकरण करण्यासाठी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर जागतिक निविदा काढून लस खरेदी करावी, अशी मागणी ...
सांगली : महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे वेळेत लसीकरण करण्यासाठी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर जागतिक निविदा काढून लस खरेदी करावी, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांनी मंगळवारी आयुक्तांकडे केली. त्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून निर्णय घेण्याची सूचनाही प्रशासनाला केली आहे.
महापालिका क्षेत्रातील लसीकरण मोहिमेत वारंवार खंड पडत आहे. दररोज लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यातच दोन ते तीन दिवस लसीकरणाचा पुरवठा केला जात असल्याने या मोहिमेत विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. अनेक नागरिक दररोज केंद्रावर हेलपाटे मारून पुन्हा घरी जात आहेत. त्यासाठी महापालिकेनेच स्वनिधीतून लस खरेदीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कोरे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग पाहता जास्तीत जास्त नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण होण्याची गरज आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे महापालिकेच्या धर्तीवर सांगली महापालिकेनेही जागतिक निविदा काढून लस खरेदी करावी. लाख ते दोन लाख लसीचे डोस खरेदी करून ते नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत. याबाबत आयुक्तांना पत्र पाठविले असून, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.