लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराचा अनुभव घेता महापालिकेकडून आपत्ती पूर्व तयारीला वेग देण्यात आला आहे. मंगळवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी तयारीचा आढावा घेतला. कृष्णा नदीपात्रात बोटींचे प्रात्यक्षिकही घेत संभाव्य आपत्ती उद्भवल्यास महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
२०१९ मध्ये सांगली आणि मिरजेच्या नदीकाठच्या भागाला महापुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे गत दोन वर्षांपासून महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मंगळवारी महापौर, आयुक्तांनी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, सुब्राव मद्रासी उपस्थित होते. महापौर आणि आयुक्तांनी नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारत यांत्रिक बोटींच्या सुस्थितीबाबतची माहिती घेतली. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी अग्निशामक विभागाकडील उपलब्ध साधन सामग्री आणि मनुष्यबळाची माहिती दिली.
चौकट
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
१. नाले, बफरझोनमधील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे.
२. पावसाळ्यात सुरू असणाऱ्या बांधकामांबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी.
३. मोबाईल टॉवरधारकांनी संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल प्रमाणपत्र महापालिकेस सादर करावे.
४. पुराच्या स्थितीत महापालिकेच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे.
चौकट
अग्निशामक विभागाकडील साधने
फायर टेंडर : ६
रेस्क्यू व्हॅन : १
लाईफ जॅकेट : १ हजार
यांत्रिक बोटी : ११
रबर बोटी : ३
जवान : ६०
लाईफ रिंग : १७
अग्निशमन उपकरणे : २४