महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:28 AM2021-05-19T04:28:16+5:302021-05-19T04:28:16+5:30
सांगली : गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी व लसीकरणाला अखेर महापालिकेला मुहूर्त मिळाला. आयुक्त नितीन कापडणीस ...
सांगली : गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी व लसीकरणाला अखेर महापालिकेला मुहूर्त मिळाला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करत नसबंदीला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. दररोज दहा ते पंधरा कुत्र्यांची नसबंदी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्याची संख्या वाढली आहे. त्यात लाॅकडाऊनच्या काळात मोकाट कुत्री आक्रमक झाली आहेत. विश्रामबाग परिसरात कुत्र्यांनी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकावर हल्ला केला होता. नागरिकांकडूनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत होती. आयुक्त कापडणीस यांनी महापालिकेकडून लसीकरण आणि नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागाने नसबंदीसाठी लागणारी सामग्री खरेदी केली. तसेच डॉ. अविनाश गोस्वामी यांची पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली. प्रत्यक्ष नसबंदी आणि लसीकरण कामास सुरुवात झाली आहे.
यावेळी नगरसेवक सुब्राव मद्रासी, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, पशुअधिकारी डॉ. अविनाश गोस्वामी, स्वच्छता निरीक्षक प्रणील माने, धनंजय कांबळे, प्राणिमित्र अजित काशीद, मुस्तफा मुजावर, मुकादम कृष्णा शिकलगार उपस्थित होते.
चौकट
निविदेला फाटा
मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी दरवर्षी महापालिकेकडून निविदा काढली जात होती. एका कुत्र्यामागे ठेकेदाराला ७०० ते ९०० रुपये दिले जात होते; पण आता महापालिकेकडूनच कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. त्यामुळे निविदेवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे.