सांगली : महापालिकेच्या बेडग रोडवरील कचरा डेपोमध्ये कोविड रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा खड्डा काढून पुरल्याचे उघड झाले आहे. याबाबत महापालिका व प्रदूषण मंडळाविरोधात हरित न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष तानाजी रुईकर आणि रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. रुईकर म्हणाले, बेडग रोड येथील कचरा डेपोमध्ये कोविड रुग्णांचा जैववैद्यकीय कचरा खड्डा काढून पुरण्यात येत असल्याबद्दल जिल्हा संघर्ष समिती आणि वड्डी गावच्या ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ औताडे, निरीक्षक मातकर, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, घनकचरा विभागाचे किल्लेदार यांच्यासोबत जिल्हा संघर्ष समितीचे सदस्यांनी स्थळाची पाहणी केली. त्यावेळी कचरा डेपोमध्ये जेसीबीने खड्डे काढून त्यामध्ये महापालिकेच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथील कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटलमधील जैविक कचरा टाकण्यात आलेला आहे, असे किल्लेदार यांनी सांगितले. यात मास्क, सुया, ग्लोव्हज्, इंजेक्शन, सलाईन, गोळ्या, पीपीई किट आदींचा कचरा सापडला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम व बायोमेडिकल वेस्टबद्दलचे नियम धाब्यावर बसवून संपूर्ण प्रकार सुरु आहे. स्थळ पाहणी अहवाल बनवून तो पुढील कारवाईसाठी पाठवू, असे आश्वासन दिले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला सुपूर्द करू, असे आश्वासन दिले. प्रत्येक कोविड सेंटर व हॉस्पिटलला नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील व डॉ. रवींद्र ताटे यांनी दिले.
यामध्ये जैववैद्यकीय कचऱ्याचा ठेका दिलेली कंपनी योग्यरित्या काम करत नसल्याचे सिद्ध होत आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याबद्दल आयुक्त कोणावर कारवाई करणार, असा प्रश्न रुईकर आणि चव्हाण यांनी उपस्थित केला.