कोरोनातही मु्न्नाभाई एमबीबीएस जोरात; १९ बोगस डॉक्टरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:17 AM2021-06-27T04:17:57+5:302021-06-27T04:17:57+5:30
सांगली : कोणत्याही वैद्यकीय शाखेची पदवी नसताना बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ चालवला आहे. केवळ इंजेक्शन करण्याचा सराव आणि ...
सांगली : कोणत्याही वैद्यकीय शाखेची पदवी नसताना बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ चालवला आहे. केवळ इंजेक्शन करण्याचा सराव आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर अनेकजण थेट रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोना संसर्गामुळे अगोदरच आव्हान निर्माण झाले असताना, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चे काम जोरात सुरू आहे. आरोग्य विभागाने वर्षभरात अशा १९ बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे.
वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेतलेले तरुण ग्रामीण सेवा देण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे कोणत्या तरी डॉक्टरच्या हाताखाली काम केलेले अनेक ‘कंपौंडर’ स्वत:ला डॉक्टर म्हणत ग्रामीण भागात सेवा देतात. डॉक्टरांकडे असताना इंजेक्शन देण्याची प्रक्रिया आणि औषधेही माहीत झालेली असल्याने अनेकजण उपचार करत आहेत.
गेल्या वर्षापासून कोरोनाची स्थिती कायम असल्याने वैद्यकीय उपचार, त्याबाबतची सजगता खूप महत्त्वाची झाली आहे. या पार्श्वभूमीवर या बोगस डॉक्टरांचे प्रमाण अद्यापही कायम आहे.
चौकट
सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ
१) जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिथे मान्यताप्राप्त डॉक्टरांना सेवा करण्यात स्वारस्य नसते, अशा ठिकाणी हे बोगस डॉक्टर आपल्या अपुऱ्या ज्ञानाच्याआधारे उपचार करत असतात. प्राथमिक उपचारासह ताप, कणकणसाठीचे इंजेक्शन व गोळ्याही देऊन ते रुग्णांना दिलासा देतात. काही रुग्णांवर टाके घालण्याचेही काम आहेत.
२) केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातील काही उपनगरांतही अशा डॉक्टरांनी बोगस पदवीच्या आधारे आपला व्यवसाय सुरू ठेवल्याचे यापूर्वी तपासातून समोर आले होते. आरोग्य विभागाला कोरोनामुळे अगोदरच कामाचा ताण वाढल्याने या बोगस डॉक्टरांवरील कारवाईही कमी होत आहे.
३) जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा आढावा घेतला तर, वर्षभरात सहा तालुक्यांत एकाही बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली नाही. तर शिराळा आणि मिरज तालुक्यातील अशा डॉक्टरांवरील कारवाईंचे प्रमाण सर्वाधिक आहे.
चौकट
तक्रार आली तरच कारवाई
बोगस डॉक्टरांवरील कारवाईसाठी तालुका आरोग्य अधिकारी व पोलिसांना सूचना दिल्या जातात. आरोग्य विभागाकडे अगोदरच मनुष्यबळाची कमतरता असल्याने एखाद्या बोगस डाॅक्टराबद्दल आरोग्य विभाग अथवा पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतरच त्याची शहानिशा करुन त्या बोगस डॉक्टरवर कारवाई केली जात असते.
चौकट
एप्रिल २०२० ते मार्च २०२१ अखेर बोगस डॉक्टरांवरील कारवाई
आटपाडी ०
कवठेमहांकाळ ०
शिराळा ५
खानापूर ०
वाळवा ०
मिरज ६
पलूस ३
तासगाव ०
जत ५
कडेगाव ०