इस्लामपूर : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे किरकोळ कारणातून एकाने दोघा भावांवर सुरी, कुऱ्हाड आणि खुरप्याने हल्ला चढवत दोघांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.
याबाबत हरिभाऊ मानसिंग देसाई (वय ५०, रा. देसाई मळा, रेठरेहरणाक्ष) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह भाऊ अभिजित लक्ष्मण देसाई हा गंभीर जखमी झाला आहे. सुरज सर्जेराव ठाकर याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी, अभिजित देसाई हा भैरवनाथ डेअरी परिसरातील रस्त्याकडेला उभे असलेल्या वाहनातून खाऊ घेत होता. यावेळी ठाकर याने वाहनचालकास शिवीगाळ करत खाऊच्या पुड्यांची नासधुस केली. अभिजित याने असे का करतोस? असे विचारण्याचा राग आल्याने ठाकर याने अभिजितला मारहाण केली. त्यानंतर घरात जाऊन सुरा घेऊन त्याला मारण्यासाठी पाठलाग करू लागला. यावेळी अभिजितने आरडाओरडा केल्याने हरिभाऊ देसाई यांच्याजवळ जाऊन थांबला. ठाकर याने सुऱ्याने फिर्यादीचे दंडावर वार केला. सुरा काढून घेतल्याने त्याने कुुऱ्हाड व खुरपे घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.