Sangli: नागज घाटातील खून अनैतिक संबंधातून; मृत, आरोपी कर्नाटकातील विजापूरचे, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 01:21 PM2024-02-17T13:21:14+5:302024-02-17T13:21:32+5:30
कवठेमहांकाळ : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील घाटात खून करून मृतदेह डिझेल ओतून जाळलेली व्यक्ती कर्नाटकातील विजापूर येथील असून, मृताच्या ...
कवठेमहांकाळ : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील घाटात खून करून मृतदेह डिझेल ओतून जाळलेली व्यक्ती कर्नाटकातील विजापूर येथील असून, मृताच्या पत्नीशी आरोपीचे असलेले अनैतिक संबंध व पैशाच्या व्यवहारातून आरोपीने चौघा साथीदारांसह खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
शरीफ हसनसाब गनवार (वय ३४, रा. अल्लापूर वेस नुराणी मस्जिदजवळ, विजापूर, कर्नाटक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, आरोपींमध्ये रफिक शब्बीर महंमदापूर (वय ३२), यासीन अन्वर बल्लरी (वय ३०), मोसिन अन्वर बल्लारी (वय २८), अल्लाउद्दीन मेहबूबसाब बावची (वय २७, सर्व रा. ख्वाॅजा मस्जिद, जेल दर्गा परिसर, विजापूर, रा. कर्नाटक) यांचा समावेश आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजापूर-गुहागर राज्य मार्गावर काही दिवसांपूर्वी नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील घाटात एका अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता. यानंतर मृताची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत ती कर्नाटकात फिरवली. यावेळी कर्नाटक राज्यातील विजापूर येथील शरीफ हसनसाब गनवार हे बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीने गोलघुमट विजापूर पोलिसात दिली होती.
त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता, त्यांचा खून आरोपी महंमदापूर याने त्याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून व पैशाच्या वादातून साथीदारांसह केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर करत आहेत.