सांगली शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणून राजवाडा चौकाचा उल्लेख होतो. या परिसरात सांगली संस्थानचा राजवाडा, गणेश दुर्ग आहे. त्यावरून चौकाला राजवाडा चौक नाव रुढ झाले. भूतपूर्व सांगली संस्थानकडून सांगली-मिरज रस्त्यावर विश्रामासाठी परिसर विकसित करण्यात आला. सध्या तो राधा स्वामी सत्संग बियास म्हणून परिचित आहे. संस्थानिकांच्या विश्रामाचे स्थान म्हणून त्या परिसराला विश्रामबाग अशी ओळख निर्माण झाली. तेथील प्रमुख चौक ‘विश्रामबाग चौक’ बनला. नंतर त्याचे नामकरण ‘क्रांतिसिंह नाना पाटील चौक’ असे करण्यात आले.
शहरातील प्रसिद्ध आझाद व्यायाम मंडळावरून ‘आझाद चौक’ हे नाव पडले. आंबेडकर क्रीडांगणाजवळ घोडके यांचे दुकान होते. मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी दुकानात येत. त्यामुळे चौकात गर्दी होती. त्यावरून २००२ मध्ये या चौकाला आझाद चौक असे नाव देण्यात आले. तत्पूर्वी हा चौक ‘कलेक्टर बंगला चौक’ म्हणून ओळखला जात होता.
सांगली बसस्थानक परिसरात सिंधी समाजाचे लोक मोठ्या संख्येने आहेत. त्यांचा व्यवसायही याच परिसरात आहे. तत्कालीन सांगली नगरपालिकेने समाजाच्या मागणीनुसार या चौकाला ‘झुलेलाल चौक’ असे नाव दिले.
सध्याचा शिंदेमळा-संजयनगर परिसरातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक’ पूर्वी ‘लव्हली सर्कल’ नावाने ओळखला जात होता. या चौकात याच नावाचे एक हॉटेल होते. त्यावरून हे नाव पडले होते. या चौकाला विष्णुअण्णा पाटील यांचे नाव देण्याचा विचार सुरू होता. तेव्हा या परिसरातील काही नागरिकांनी एकत्र येत रात्रीत चौकातील झाडेझुडपे साफ करून अहिल्यादेवींच्या नावाचा फलक लावला. तेव्हापासून हा चौक ‘अहिल्यादेवी होळकर चौक’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
चौकट
महाराणी झाशी चौक
इंदिरा गांधी सांगलीत आल्या होत्या. त्यांचे स्वागत गणपती पेठेतील चौकात झाले होते. तेव्हा नागरिकांनी त्या चौकात महाराणी झाशी लक्ष्मीबाई यांचा पुतळा ठेवला होता. इंदिरा गांधी यांनाही महाराणी झाशी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा भेट दिली होती. तेव्हापासून या चौकाचे नाव ‘महाराणी झाशी चौक’ असे पडले. पूर्वी या चौकाला ‘माने कॉर्नर’ असे म्हटले जायचे.
चौकट
सीमोल्लंघनाचे झाले शिलंगण (फोटो)
शिलंगण हा सीमोल्लंघन शब्दाचा अपभ्रंश आहे. स्वरूप थिएटरजवळच्या या चौकात संस्थानच्या काळात दसऱ्याला सोने लुटले जायचे. तिथे आजही आपट्याचे झाड व दगडी कट्टा आहे. हत्ती, उंट, घोडे असा लवाजमा घेऊन पटवर्धन सरकार चौकात येत. सोने लुटण्याचा पहिला मान सरकारांचा. त्यानंतर सांगलीकर सोने लुटत असत. दसऱ्यादिवशी सोने लुटण्यासाठी या चौकात संपूर्ण सांगली लोटायची. तिथे सीमोल्लंघन व्हायचे. त्याचाच अपभ्रंश होत शिलंगण हे नाव रुढ झाले आणि चौक बनला ‘शिलंगण चौक’. त्यानंतर तेथे त्याच नावाने शिलंगण गणेशोत्सव मंडळाचीही स्थापना झाली.